संघटनेतील अंतर्गत बंडाळ्यांचा विपरीत परिणाम होऊ न देता भारतीय बॉक्सिंगपटू ऑलिम्पिक प्रवेशाच्या निर्धाराने दोहा येथे सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग संघटना बरखास्त केली आहे. खेळाडूंच्या हितासाठी अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे. अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय संघटनेच्या झेंडय़ाखाली प्रतिनिधित्व करणार आहेत. या सगळ्या गोंधळाने विचलित न होता सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय बॉक्सिंगपटूंसमोर आहे. कोणत्याही स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळालेली नसतानाही सहा भारतीय बॉक्सिंगपटूंनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेद्वारे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.

एल. देवेन्द्रो सिंग (४९ किलो), मदन लाल (५२ किलो), शिवा थापा (५६ किलो), मनोज कुमार (६४ किलो), विकास कृष्णन (७५ किलो) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक) हे या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

‘‘सहा जण आत्मविश्वासाने सज्ज आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अव्वल बॉक्सिंगपटूंना टक्कर देणे सोपे नाही. मात्र प्रत्येकाने कसून तयारी केली आहे. वेळापत्रकाचा आराखडा आम्हाला सोयीचा असेल,’’ असे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू यांनी सांगितले.

विकास कृष्णनने २००१मध्ये याच स्पर्धेत पदकावर नाव कोरले होते. विजेंदर सिंगचा अपवादवगळता अजिंक्यपद दर्जाच्या स्पर्धेत अव्वल तीनमध्ये धडक मारणारा तो एकमेव भारतीय बॉक्सिंगपटू आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आशियाई स्पर्धेत विकासने रौप्यपदक पटकावले होते. शिवा थापाच्या वजनी गटात अव्वल तीन स्थान राखणाऱ्या खेळाडूंची रिओवारी पक्की होणार असल्याने चुरस आहे. देवेंद्रोने त्याच्या वजनी गटात सुवर्ण किंवा रौप्यपदक पटकावले तरच त्याची ऑलिम्पिक वारी निश्चित होऊ शकते. त्यामुळे त्याच्यावरही दडपण आहे. सतीशलाही रिओ ऑलिम्पिकसाठी सुवर्णपदक पटकावणे क्रमप्राप्त आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून २३ बॉक्सिंगपटूंची ऑलिम्पिकवारी पक्की होऊ शकते. ७३ विविध देशांचे २६० बॉक्सिंगपटू १० विविध वजनी गटात सहभागी होणार आहेत.