ब्राझील आणि नेदरलँड्स आता तिसऱ्या स्थानासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विश्वचषकातील या दोन्ही संघांचे विश्वविजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. दोन्ही संघांना आता प्रतिष्ठेचे तिसरे स्थान मिळवण्यासाठी लढायचे आहे. परंतु मानहानीकारक पराभव पत्करणाऱ्या यजमान ब्राझीलसाठी ही लढत अधिक महत्त्वाची असेल. हा विश्वचषक ब्राझील जिंकेल, असे स्पध्रेपूर्वी अंदाज वर्तवले जात होते. देशवासीयांनी खेळाडूंना डोक्यावर घेतले होते. पण जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांचे विश्वविजयाचे स्वप्न धुळीस मिळाले. जर्मनीकडून त्यांचा नुसता पराभव झाला असता तर ठीक होते, पण जर्मनीने तर सात गोल करीत त्यांची लक्तरेच वेशीवर टांगली. ब्राझीलच्या संघाची पुरती नाचक्की झाली. त्यामुळे हा पराभव जिव्हारी लागणारा होता. या पराभवाने ब्राझीलच्या मर्यादा स्पष्ट केल्या. नेयमार आणि कर्णधार थिआगो सिल्वा संघात नसतील तर त्यांचा संघ नवख्या संघापेक्षाही वाइट पद्धतीने पराभूत होऊ शकतो, हे या सामन्यात अवघ्या फुटबॉल विश्वाने अनुभवले. त्यामुळे ब्राझीलच्या संघाला या सामन्यात विजय मिळवून आपली शान राखता येईल.
जर्मनीने बेदरकार खेळ करत ब्राझीलचे वस्त्रहरण केले. त्यामुळे अशा पराभवातून बाहेर येणे ब्राझीलसाठी तितकेसे सोपे नसेल. कारण या पराभवाने त्यांचे मानसिकरीत्या खच्चीकरण झाले असेल. त्यामुळे खेळाडू शारीरिक तंदुरुस्त असले तरी त्यांचे मानसिक संतुलन योग्य असेलच, असे नाही. पण त्यांना जर तिसरे स्थान मिळवायचे असेल तर त्यांना या पराभवाच्या कटू आठवणींना तिलांजली द्यावी लागेल. या पराभवाच्या आठवणी विसरून त्यांनी नव्याने सरावाला सुरुवात करायला हवी. कर्णधार सिल्वा या सामन्यात संघात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर संघाच्या बचावाची भिस्त असेल. तो जर्मनीविरुद्ध नसताना त्यांच्या बचावाच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या. त्याचबरोबर ब्राझीलला आक्रमणावरही मेहनत घ्यावी लागेल. आपण विश्वचषक जिंकू शकलो नसलो, तरी स्पर्धेचा शेवट गोड करून देशवासीयांना आनंद द्यावा, हीच भावना ब्राझीलच्या खेळाडूंच्या मनात असेल. या सामन्यात त्यांना गमावण्यासारखे काहीच नसेल, कारण ते बरेच काही गमावून बसले आहेत. त्यामुळे या सामन्यात त्यांनी मुक्तपणे खेळायला हवे. नेयमारची उणीव त्यांना या सामन्यातही जाणवेल. कारण त्याची जागा भरणारा दुसरा खेळाडू त्यांच्याकडे दिसत नाही. पण त्याच्या अनुपस्थितीतही ब्राझील जिंकू शकते, हे अन्य खेळाडूंना दाखवायला हवे. प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांचाही हा अखेरचा सामना असण्याची शक्यता आहे, कारण विश्वचषकातील पराभवानंतर त्यांच्याकडून प्रशिक्षकपद काढून घेण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नेदरलँड्सचा संघ अजूनही तेवढाच बलवान दिसत आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने खेळाडूंचे मनोबल खचलेले असेल. पराभवाच्या मानसिकतेतून त्यांनी बाहेर यायला हवे. प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांच्याकडे या सामन्यात प्रयोग करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतील आणि गमावण्यासारखेही काही नसेल, त्यामुळे या सामन्यांमध्ये त्यांनी अधिकाधिक प्रयोग करायला हवेत. नेदरलँड्सचे आक्रमण हे मुख्य अस्त्र आहे आणि त्याचा वापर त्यांनी करायलाच हवा.
हा सामना ब्राझीलचा बचाव आणि नेदरलँड्सचे आक्रमण यांच्यामध्ये चांगला रंगेल. त्याचबरोबर दक्षिण अमेरिका आणि युरोप यांच्यातील फुटबॉल कौशल्याचा हा सामना असेल. दोन्हीही शैली भिन्न आहेत. त्यामुळे कोणत्या शैलीचा विकास झाला आहे आणि कोणती शैली श्रेष्ठ आहे हे या आणि अंतिम सामन्यामध्ये दिसून येईल.
(लेखक फुटबॉल प्रशिक्षक आहेत)