मायदेशात विश्वचषकातील दारुण पराभव स्वीकारल्यानंतर ब्राझीलने आता पुढे वाटचाल करण्याचे ठरवले आहे. माजी विश्वविजेते कर्णधार डुंगा यांच्याकडे दुसऱ्यांदा ब्राझीलने प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली असून, आता समस्त ब्राझीलवासीयांच्या आशा त्यांच्यावर आहेत.
ब्राझील फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष जोस मारिया मारिन यांनी प्रशिक्षकपदी डुंगा यांच्या नावाची घोषणा केली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा डिल्मा रौसेफ मात्र ब्राझील महासंघामध्ये बदल करण्याच्या विचारात असून ऑक्टोबरमध्ये पुनर्निवडणूक घेण्याचे त्यांनी ठरवले आहे. यासाठी त्यांनी खेळाडूंना एकत्र आणून खेळाच्या स्वरूपाविषयी लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
ब्राझीलचा संघ या विश्वचषकात नेयमारवर अधिक अवलंबून होता. पण उपांत्य फेरीच्या जर्मनीविरुद्धच्या सामन्याआधी नेयमार जायबंदी झाल्याने ब्राझीलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे डुंगा यांना वैयक्तिक खेळाडूंची फळी तयार करावी लागणार आहे. ‘‘तांत्रिक समन्वयक गिल्मार रिनाल्डीसह मी संघाला नवी झळाळी देण्यासंदर्भात चर्चा करणार आहे. मेहनत व शिस्तीबाबत मी कठोर असून यापुढे खेळाडू व पत्रकारांशी चांगले संबंध ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’’ असे डुंगा म्हणाले.