ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमुळे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला भरपूर प्रोत्साहनदायक चालना मिळेल, असा समज असला तरी ‘मूडी’ या संस्थेच्या अहवालानुसार तेथे मर्यादितच चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मूडीज गुंतवणूक सेवा संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘‘या स्पर्धेमुळे ब्राझीलमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत आहे. तसेच कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण होणार आहे.’’

‘‘दोन वर्षांपूर्वी झालेल्या फिफा विश्वचषक  फुटबॉल स्पर्धेच्या वेळी १२ शहरांमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या खर्चाएवढाच खर्च ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी होणार आहे. यंदा देशाला आर्थिक मंदीतूनच जावे लागत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनामुळे या परिस्थितीत फारसा बदल होणार नाही,’’ असे मूडीच्या अहवालात म्हटले आहे.

‘‘ऑलिम्पिकमध्ये दहा हजार खेळाडू सहभागी होणार आहेत आणि साडेतीन लाख पर्यटक त्या वेळी येतील अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, मेट्रो व ट्राम सेवा, मोटारी भाडेतत्त्वावर घेणे, अन्य वाहनव्यवस्था आदी माध्यमांद्वारे येथील स्थानिक लोकांना व कंपन्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. अर्थात फक्त ऑलिम्पिक काळापुरतीच ही चांगली स्थिती असणार आहे. नंतर मात्र ऑलिम्पिक सुविधांचे करायचे काय व त्याचा विनियोग आर्थिक फायद्यासाठी कसा होईल आदींबाबत संयोजकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल,’’ असे मूडीच्या अहवालात म्हटले आहे