तब्बल २६ वर्षांच्या कारकीर्दीत मँचेस्टर युनायटेडला १३ इंग्लिश प्रीमिअर लीग जेतेपदे मिळवून देणारे सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन हे फुटबॉलच्या इतिसाहातील सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत, अशा शब्दांत ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी त्यांची स्तुती केली आहे.  ‘‘फग्र्युसन हे अद्वितीय व्यक्तिमत्व होते. कोणत्याही क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले असले तर ते महान नेते ठरले असते. फग्र्युसन यांनी फुटबॉल हे क्षेत्र निवडल्यामुळे मँचेस्टर युनायटेडचे भाग्य उजळले,’’ असे ‘डेली टेलिग्राफ’ने म्हटले आहे. ‘‘फग्र्युसन यांची गुणवत्ता शोधून काढण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी होती. फग्र्युसन यांनी इंग्लिश फुटबॉलला अनेक नवे चेहरे दिले. त्यांच्या निवृत्तीमुळे इंग्लिश फुटबॉलचे आणि इंग्लंड संघाचे मोठे नुकसान होणार आहे,’’ असे ‘द टाइम्स’ने म्हटले आहे. युनायटेडच्या सराव शिबिरात फग्र्युसन यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय खेळाडू तसेच अन्य प्रशिक्षकांना सांगितला, त्यावेळी त्यांना अश्रूचा बांध आवरता आला नाही, असेही काही वृत्तपत्रांनी म्हटले आहे.