काही दिवसांपूर्वीच लक्ष्य सेनने आपला १६ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी काही दिवसांनी आपण इतकी मोठी कामगिरी करु याची त्याला पुसटशी कल्पनाही नसेल. मात्र आज वर्ल्ड बॅडमिंटन ज्यूनिअर क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यने आज बल्गेरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावून नवीन इतिहासाची नोंद केली आहे. आपल्यापेक्षा वयाने १३ वर्ष मोठ्या असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला लक्ष्यने नमवत विजेतेपद पटकावलं आहे. लक्ष्यच्या कारकिर्दीतलं हे दुसरं सिनीअर आंतराष्ट्रीय विजेतेपद ठरलं.

जागतिक क्रमवारीत लक्ष्य हा १६७ व्या क्रमांकावर आहे. मात्र अंतिम फेरीत त्याची गाठ ही क्रोएशियाच्या झ्विनोमीर डर्किनजॅकशी होती. झ्विनोमीरला या स्पर्धेत दुसरं मानांकन मिळालं होतं, तसेच जागतिक क्रमवारीत झ्विनोमीर १०२ क्रमांकावर असल्यामुळे लक्ष्य सामन्यात फार काही चमक दाखवणार नाही असंच वाटत होतं.

प्रत्यक्ष सामन्यातही झ्विनोमीरने धडाकेबाज सुरुवात करत पहिला सेट आपल्या खिशात घातला. या सेटमध्येही लक्ष्यने आपल्या प्रतिस्पर्ध्याला चांगली लढत दिली, मात्र १८-२१ अशा फरकाने झ्विनोमीरने पहिला सेट जिंकला. मात्र त्यानंतरच्या सेटमध्ये लक्ष्यने दणक्यात पुनरागमन करत अंतिम सामन्यासह विजेतेपद आपल्या खिशात घातलं. दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे २१-१२, २१-१७ असा जिंकत लक्ष्यने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

लक्ष्यसाठी या स्पर्धेचं विजेतेपद हे खूप महत्वाचं मानलं जातं होतं. मागच्या महिन्यात आशियाई ज्युनिअर चँम्पियनशीप स्पर्धेत लक्ष्यला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर आपल्या खेळात सुधारणा करत लक्ष्यने आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या खेळाडूवर मात करत भारतीय बॅडमिंटनचं नाव आणखीनच उंचावर नेऊन ठेवलंय.

अवश्य वाचा – जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर