भारताच्या महिला क्रिकेट संघाने काल (गुरुवारी) विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतीय संघाने अंतिम प्रवेश केल्यामुळे कर्णधार मिताली राजच्या नावावर आणखी एक विक्रम जमा होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत दिग्गज भारतीय कर्णधारांना न जमलेली कामगिरी मिताली राजने करुन दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात मिताली राज कर्णधार म्हणून दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्त्व करणार आहे. याआधी भारतीय संघाने २००५ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धेत धडक दिली होती. त्यावेळीही मिताली राजकडेच संघाचे नेतृत्त्व होते. त्यामुळे आता रविवारी विश्वचषक स्पर्धेत मिताली राज दुसऱ्यांदा भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी मैदानात उतरेल.

मिताली राजने केलेली ही कामगिरी आतापर्यंत भारताच्या पुरुष कर्णधारांनादेखील जमलेली नाही. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यानंतर सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला. मात्र भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दोनदा अंतिम फेरी गाठण्याची किमया कोणत्याही कर्णधाराला साधता आलेली नाही. भारताच्या दिग्गज कर्णधारांना न जमलेली कामगिरी मिताली राजने करुन दाखवली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बी येथे खेळवण्यात आलेला सामना जिंकत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. कांगारुंचा फडशा पाडत भारतीय महिला संघाने या मैदानावरील विजयी कामगिरीचा सिलसिला कायम ठेवला. याआधी या मैदानावर भारताने इंग्लंडचा ३५ धावांनी, पाकिस्तानता ९५ धावांनी, श्रीलंकेचा १६ धावांनी आणि न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव केला आहे. हरमनप्रीतच्या धडाकेबाज १७१ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४२ षटकांमध्ये २८१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ४० षटकांमध्ये २४५ धावांमध्ये संपुष्टात आला.