इंग्लंडविरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर
धावांच्या दुष्काळात सापडलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या वीरेंद्र सेहवागला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यावर निवड समितीने अखेर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी रविवारी रात्री निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी संघातून सेहवागला वगळण्याचा निर्णय घेत चेतेश्वर पुजाराला संघात स्थान देण्याचे निवड समितीने ठरवले.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या सरावाच्या वेळी सेहवागशी निवड समिती सदस्य विक्रम राठोड आणि साबा करीम यांनी गंभीरपणे संवाद साधला होता, त्यावेळीच सेहवागला वगळणार, अशी शंकेची पाल बऱ्याच जणांच्या मनात चुकचुकली होती. चेतेश्वरला संघात स्थान देण्यात आले असले तरी त्याला कोणाच्या जागेवर खेळवणार, हा प्रश्न नक्कीच संघ व्यवस्थापनापुढे असेल. निवड समितीने हा एक बदल वगळता अन्य नापास ठरलेल्या फलंदाजांना जीवदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ११, १५ आणि १९ जानेवारीला अनुक्रमे राजकोट, कोची आणि रांची या ठिकाणी पहिले तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.
संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, शामी अहमद, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा.