रशियात २०१८मध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेसाठीच्या अंतिम पात्रता फेरीतून बाद झालेला भारतीय संघ गुरुवारी पहिल्या विजयाच्या शोधात ग्वामविरुद्ध खेळणार आहे. ‘ड’ गटात सलग पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताची पाटी कोरीच राहिली आहे, तर ग्वामने पाच सामन्यांत सात गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताची विजयाची प्रतीक्षा संपणार तरी कधी, असा प्रश्न फुटबॉलप्रेमींना पडला आहे.

स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी पराभवाची मालिका खंडित करण्याची हीच योग्य संधी आहे. भारतीय संघातील बरेच खेळाडू इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेत खेळत असल्यामुळे त्यांच्या गाठीशी चांगला अनुभव आला आहे. त्यामुळे ग्वामकडून (२-१) त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारत उत्सुक आहे.
आशियाई खंडातून विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने पाहिल्यास भारत स्पध्रेबाहेर झाला आहे. इराण (११) आणि ओमान (८) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे गट विजेता आणि चार उपविजेते अशा एकूण पाच संघांना पात्रता फेरीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश मिळणार आहे. ग्वामविरुद्धच्या सामन्यानंतर भारताला तुर्कमेनिस्तान आणि इराण यांच्याशी खेळावे लागणार आहे. विश्वचषक पात्रता फेरीचे स्वप्न भंगलेल्या भारतासमोर २०१९च्या आशियाई चषक स्पध्रेत पात्रता मिळवण्याचे आव्हानही आहे. त्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे.