ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि या पराभवाचे खापर काहींनी युवराज सिंगच्या माथी फोडायला सुरुवात केली, पण भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र युवराजबाबतच्या प्रश्नांना सावधपणे उत्तरे देत, हे होतच असते, असा पवित्रा घेतला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताला १३० धावाच करता आल्या होत्या. एका बाजूने विराट कोहलीने अर्धशतक झळकावले असले तरी युवराज सिंगला मात्र लय सापडली नव्हती. युवराजला २१ चेंडूंमध्ये फक्त ११ धावा करता आल्या आणि त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, अशी टीका काही जणांनी केली होती.
‘‘युवराजसाठी हा दिवस चांगला नव्हता. त्याने त्याच्या परीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडून तसे घडले नाही आणि पहिल्या चेंडूपासून त्याला धावा जमवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली, सहजपणे त्याला धावा जमवता आल्या नाहीत,’’ असे धोनीने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवराजबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
युवराजकडून धावा होत नसताना त्याला कोणता संदेश पाठवण्यात आला होता का, असा प्रश्न विचारल्यावर धोनी म्हणाला की, ‘‘नाही, कारण तो त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होता. तुमच्या हातामध्ये तेवढेच असते.’’
या कामगिरीमुळे युवराज भविष्यामध्ये भारताच्या संघात दिसणार का, असे विचारल्यावर धोनीने सुरुवातीला थोडेसे स्मित केले आणि म्हणाला की, ‘‘सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोसम संपला असून आता स्थानिक स्पर्धाना सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धेचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या निवडीची प्रक्रिया नजीकच्या काळामध्ये होणार नसल्याने त्याबाबत आता भाष्य करता येणार नाही.’’
युवराजबाबत काही आक्रमक प्रतिक्रिया आल्यावर धोनी गंभीर झाला. तो म्हणाला, ‘‘वाईट कामगिरीने चाहते आक्रमक होऊ शकतात, पण एका खेळाडूवर टीका करणे योग्य नाही, कारण ४० हजार प्रेक्षकांसमोर कोणत्याही खेळाडूला जाणूनबुजून वाईट कामगिरी करायची नसते. तुम्हाला झेल सोडायचे नसतात, पण तसे प्रकार घडताना दिसतात आणि कोणत्याही खेळाडूकडून चुका होऊ शकतात. माझ्या मते युवराजसाठी रविवारचा दिवस चांगला नव्हता.’’

जेव्हा एखादा संघ सामन्यात पराभूत होतो, तेव्हा त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुरू होते. आयुष्यामध्ये जसे चढ-उतार येत असतात तसेच ते खेळामध्येही येत असतात. जेव्हा एखादा खेळाडू वाईट फॉर्मातून जात असतो, तेव्हा त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नाही आणि त्या वेळी त्याला संघातून वगळण्यात येते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्यामुळे एकटय़ा युवराजवर पराभवाचे खापर फोडणे योग्य नाही.
– योगराज सिंग, युवराजचे वडील.

एकटय़ा युवराजला पराभवासाठी कारणीभूत ठरवणे धक्कादायक आहे, कारण युवराजने दोन विश्वचषक स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. १९-वर्षांखालील विश्वचषक, नॅटवेस्ट करंडक, २००७चा विश्वचषक आणि २०११च्या विश्वचषकापर्यंत युवराजने संघाला बरेच सामने जिंकून दिले आहेत. फक्त एका वाईट कामगिरीमुळे त्याच्यावर टीका करणे दु:खद आहे.
– हरभजन सिंग, भारताचा फिरकीपटू.