ज्युवेंट्सचा आघाडीवीर कालरेस टेवेझने जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर अर्जेटिना संघात पुनरागमन केले आहे. प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांनी क्रोएशिया आणि पोर्तुगालविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी अर्जेटिना संघाची घोषणा केली, त्यात ३० वर्षीय टेवेझचा समावेश आहे.
प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांच्या २०११ ते २०१४च्या कालावधीदरम्यान टेवेझला संघात स्थान देण्यात आले नव्हते. २०११च्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टेवेझ अर्जेटिनातर्फे अखेरचा सामना खेळला होता. या मोसमात टेवेझने ज्युवेंट्सतर्फे खेळताना सेरी-ए स्पर्धेत सहा तर चॅम्पियन्स लीगमध्ये दोन गोल केले आहेत. २००४ ते २०११ या कालावधीत अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करताना टेवेझने ६४ सामन्यांत १३ गोल लगावले आहेत. मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळताना त्याने २००८ आणि २००९मध्ये इंग्लिश प्रीमिअर लीगचे तर २००८मध्ये चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले होते. २०१२मध्ये मँचेस्टर सिटीकडून खेळताना त्याने इंग्लिश प्रीमिअर लीग जेतेपदावर नाव कोरले होते.
अर्जेटिना संघ
गोलरक्षक : सर्जिओ रोमेरो, नाहुएल गुझमॅन, विल्फ्रेडो कॅबालेरो. बचावफळी : मार्टिन डेमिचेलिस, पाबलो झाबालेटा, इझेक्वायल गॅरे, मार्कोस रोजो, फेडेरिका फर्नाडेझ, निकोलस ओटामेंडी, फाकुंडो रोंकाग्लिआ, फेडेरिको फॅझिओ, ख्रिस्तियन अन्साल्डी. मधली फळी : लुकास बिग्लिआ, अँजेल डी मारिया, जेवियर मॅस्चेरानो, निकोलस गैतान, इन्झो पेरेझ, जेवियर पॅस्तोर, इव्हेर बनेगा, रॉबेटरे पेरेयरा, इरिक लॅमेला. आघाडीची फळी : कालरेस टेवेझ, सर्जिओ अ‍ॅग्युरो, गोंझालो हिग्युएन, लिओनेल मेस्सी.