आयुष्य खूप हाल-अपेष्टांमध्ये गेले, गाठीशी पुरेसे पैसे नसतानाही आम्ही कॅरम खेळावर जीवापाड प्रेम केले. त्यामुळेच हा दिवस पाहायला मिळत आहे. याचसाठी केला होता अट्टहास.. अशा भावना कॅरममधील रथी-महारथी ज्येष्ठ खेळाडूंनी व्यक्त केल्या, त्यावेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या सुहास कांबळी, रमेश चिट्टी, कादिर खान, विजय संगम आणि प्रकाश रेळे या कॅरममधील एक काळ गाजवलेल्या खेळाडूंनी आपल्या जुन्या आठवणींना मोकळी वाट करून दिली. पाहुण्यांपासून होणारा खोळंबा आणि भाषणबाजीला फाटा देत कॅरमच्या इतिहासात प्रथमच झालेल्या शानदार सन्मान सोहळ्याप्रसंगी हे खेळाडू भावनाविवश झाले होते.
‘‘सातवीपर्यंत पायात चप्पल नव्हती, घरून कॅरम खेळण्यावर बंदी होती. सुट्टीमध्ये जिथे कॅरम चालायचा तिथे वेळेपूर्वी जाऊन साफसफाई करायचो, तेव्हा मला कॅरमवर काही मिनिटे खेळायला मिळायची. घरून रात्री सर्वाची नजर चुकवून पहाटे ३.३०पर्यंत कॅरम बघायला जायचो आणि सव्वासातला शाळेत जायचो. कॅरमसाठी १९७० साली ७५० रुपयांची नोकरी सोडल्याने घरातून हाकलवून लावले होते. पण खेळावर निस्सीम भक्ती होती आणि या खेळानेच मला मोठे केले,’’ असा जवळपास साठ वर्षांपूर्वींचा आठवणींचा पट उलगडताना कांबळींना गहिवरून आले.
आंतराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक रमेश चिट्टी म्हणाले, ‘‘१९५४ साली मी कॅरम खेळायला लागलो आणि १९६६मध्ये श्रीलंकेला खेळायला जायची संधी मिळाली, तेव्हा गाठीशी पैसे नव्हते. त्यावेळी आमचे मार्गदर्शक मुक्तार अहमद मला विविध क्लब्जमध्ये घेऊन गेले आणि माझी माहिती सांगून स्पर्धेसाठी पैसे गोळा केले. त्यावेळी रोख पारितोषिके नसायची. चषक किंवा ढाल मिळायची, पण अहमद यांनी कॅरममध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक आणले. मी त्यावेळी दहा पदके जिंकली होती, आज त्यांचा बाजारात भाव किती आहे मला मला माहीत नाही, परंतु माझ्यासाठी ती अनमोलच आहेत.’’
माजी आंतराष्ट्रीय खेळाडू कादिर खान यावेळी म्हणाले की, ‘‘आता खेळाडूंना, पैसा, ग्लॅमर मिळत असले तरी त्या काळात यामधली एकही गोष्ट आमच्या वाटय़ाला आली नाही. पण जीवाचे रान करून आम्ही कॅरम खेळलो. कॅरम हेच आमचे सर्वस्व होते आणि यापुढे असेल. त्यावेळी कुठेही दौऱ्यावर गेल्यावर पैसे नसायचे, पण आम्ही कधीही हार मानली नाही. आमच्यासाठी पैशापेक्षा खेळ मोलाचा होता.’’
आंतराष्ट्रीय खेळाडू आणि नावाजलेले पंच प्रकाश रेळे यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला खेळापासून पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली नसली तरी निखळ आनंद मिळाला. खेळच आमचा धर्म होता. खेळताना मी पंचगिरीही करायला लागलो, स्पर्धाही भरवल्या. कारण खेळाचा विकास आणि प्रसार व्हायला हवा, हाच एकमेव उद्देश होता.’’ आंतरराष्ट्रीय खेळाडू विजय संगम म्हणाले की, ‘‘आंतराष्ट्रीय दौऱ्यावर जाण्याचा उत्साह असायचा, पण पैसा कोणाकडेच नसायचा. आर्थिक गणिते जेमतेम साधून आम्ही दौऱ्यावर जायचो. तो काळ वेगळाच होता, त्याची तुलना या काळाशी करताच येणार नाही.’’