रहिम स्टेर्लिगने मँचेस्टर सिटी आणि प्रतिस्पर्धी सेल्टिक क्लबकडून गोल केल्यामुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत गुरुवारी ग्लासगो येथे सेल्टिक पार्कवर थरारक सामन्याची अनुभूती जवळपास ६० हजार प्रेक्षकांनी घेतली. सेल्टिकने थरारक सामन्यात सिटीला ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. दुसरीकडे अ‍ॅटलेटिको माद्रिदने बायर्न म्युनिकवर १-० असा विजय मिळवला.

‘क’ गटातील सामन्यात  पेप गॉर्डीओलाच्या संघाला तीनवेळा पिछाडी भरून काढूनही बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला एरिक स्विएटचेंकोने हेडरद्वारे टोलावलेला चेंडू मौसा डेम्बेलेने अप्रतिमरीत्या गोलजाळीत टोलवून सेल्टिकला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ११व्या मिनिटाला कायरेन टिएर्नीच्या पासवर फर्नाडिन्होने गोल करून सिटीला बरोबरी मिळवून दिली. २०व्या मिनिटाला स्टेर्लिगच्या स्वयंगोलने सेल्टिकला २-१ असे आघाडीवर आणले. अवघ्या ८ मिनिटांत स्टेर्लिगने ही भरपाई भरून काढली आणि सिटीसाठी गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला.

मध्यंतरानंतर अवघ्या दोन मिनिटांत डेम्बेलेने गोल करून सेल्टिकला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. नोलिटोने गोल करून सिटीला तिसऱ्यांदा ३-३ अशी बरोबरी मिळवून दिली.  सिटी विजय मिळवेल असे वाटत होते, परंतु सेल्टिकचा बचाव त्यांना भेदता आला नाही.

बार्सिलोनाचे दमदार पुनरागमन :  लिओनेल मेस्सी शिवाय खेळणाऱ्या बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या ‘क’ गटात बोरुसिया मॉन्चेग्लॅडबॅच क्लबवर ०-१ अशा पिछाडीवरून २-१ असा विजय मिळवला. चेल्सीचा मध्यरक्षक इडन हझार्ड याचा भाऊ थॉर्गन हझार्डने पहिल्या सत्रात ग्लॅडबॅच क्लबला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, अखेरच्या २५ मिनिटांत अ‍ॅर्डा टुरान आणि गेरार्ड पिक्यू यांनी गोल करत बार्सिलोनाचा विजय निश्चित केला.

 

अन्नू राणीचा नवा राष्ट्रीय विक्रम

लखनौ : भालाफेकपटू अन्नू राणीने लखनौ येथे सुरू असलेल्या खुल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेत सुवर्णपदकासह नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने स्वत:च्याच नावावर असलेला ५९.८७ मीटर राष्ट्रीय विक्रम गुरुवारी ६०.०१ मीटर अंतर पार करून मोडला. ६० मीटरवर भालाफेक करणारी अन्नू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

२४ वर्षीय अन्नू रेल्वेचे प्रतिनिधित्व करते. ओएनजीसीच्या पूनम राणीने ५६.७३ मीटरसह रौप्य, तर रेल्वेच्या के. रश्मीने ५१.५६ मीटरसह कांस्यपदक जिंकले.

उंच उडीत पहिल्यांदा अव्वल तिन्ही खेळाडूंनी २.२० मीटर उडी मारण्याचा विक्रम प्रस्तापित केला. दिल्लीच्या तेजस्वीन शंकरने २.२२ मीटरसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. सेनादलच्या चेतन आणि केरलाच्या श्रीनिथ मोहन यांनी २.२० मीटरसह अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.