विविध राज्यांमधील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांची माहिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्व राज्यांमधील क्रीडामंत्र्यांची २० व २१ मार्च रोजी बैठक आयोजित केली आहे.
केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री सर्बानंद सोनोवल यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तरांच्या वेळी ही माहिती दिली. देशातील क्रीडासुविधांच्या स्थितीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर द्यावे, अशी सूचना सभापती सुमित्रा महाजन यांनी क्रीडामंत्र्यांना दिली. त्यानंतर सोनोवल म्हणाले, ‘‘देशात उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा फक्त काही मर्यादित खेळाडूंकरिताच उपलब्ध असतात. सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आजपर्यंत घेण्यात आलेले प्रयत्न अपुरे आहेत. त्यामुळेच सर्व राज्यांच्या क्रीडामंत्र्यांची येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.’’
‘‘ग्रामीण भागात क्रीडा व मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करणे, त्याची देखभाल करणे ही जबाबदारी संबंधित राज्य शासनांनी घेतली पाहिजे. राज्यांना सहकार्य करण्यासाठी केंद्र शासनाने राजीव गांधी क्रीडा विकास योजना सुरू केली आहे. त्या योजनेद्वारे विविध क्रीडाविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत,’’ असे सोनोवाल म्हणाले.