नमन ओझाच्या द्विशतकाच्या जोरावर दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागाविरुद्ध खेळताना मध्य विभागाने पहिल्या डावात ५३८ धावांचा डोंगर उभारला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी ओझाने शतक झळकावत संघाला सावरले होते, तर गुरुवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावत संघाला सुस्थितीत नेले आहे. ओझाने २३ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर २१७ धावांची अप्रतिम खेळी साकारली. अशोक मनेरिया (६२) अर्धशतकी खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. पण अन्य फलंदाजांना मात्र दुसऱ्या दिवशी अर्धशतकाची वेस ओलांडता आली नाही. प्रत्युतरादाखल उत्तर विभागाने दिवस अखेर गौतम गंभीरच्या नाबाद ६८ धावांच्या खेळीच्या जोरावर २ बाद १३० अशी मजल मारली आहे.
संक्षिप्त धावफलक
मध्य विभाग (पहिला डाव) : १४५.४ षटकांत सर्व बाद ५३८ (नमन ओझा २१७, जलाज सक्सेना ११०; रिषी धवन ३/१२३) वि. उत्तर विभाग (पहिला डाव) : ३४ षटकांत २ बाद १३० (गौतम गंभीर नाबाद ६८; पंकज सिंग १/२५).