* सलामीवीर मुरली विजयचे शानदार शतक
* शेष भारताची ५ बाद ३३० अशी समाधानकारक मजल
* शिखर धवन, अंबाती रायुडू यांची अर्धशतके
‘थांबा आणि वाट पाहा’ या सूचनेमुळे इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलामीवीर मुरली विजयला राखीव खेळाडू म्हणून संघाबाहेर राहावे लागले. त्या मालिकेत भारतीय संघही अपयशी ठरला आणि भारताची सलामीची जोडी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरही. परंतु तरीही विजयच्या नशिबी मात्र प्रतीक्षाच होती. बुधवारी इराणी करंडक सामन्याच्या पहिल्या दिवशी मुरली विजय मुंबईच्या गोलंदाजांवर त्वेषाने बरसला. आपल्या शतकी खेळीच्या बळावर मुरलीने भारतीय संघाचे दार सताड उघडावे, यासाठी साकडे घातले. याशिवाय अन्य सलामीवीर शिखर धवन आणि मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू यांच्या अर्धशतकांच्या बळावर शेष भारताने ५ बाद ३३० अशी समाधानकारक मजल मारली आहे.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसावर मुरलीने आपले नाव कोरले. साडेचार तास किल्ला लढवत मुरलीने २०६ चेंडूंत १७ चौकार आणि एका षटकारानिशी आपली ११६ धावांची शतकी खेळी त्याने साकारली. गतवर्षी बंगळुरूला झालेल्या राजस्थानविरुद्धच्या इराणी सामन्यात मुरलीने द्विशतकी खेळी साकारली होती. बुधवारी मुरलीने शिखर धवन (६३)सोबत १४४ धावांची दमदार सलामी नोंदवली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वीरू आणि गौती धावांसाठी झगडत असताना तामिळनाडूचा सलामीवीर मुरली विजयला संधी देण्यात आली नव्हती. परंतु आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर या दोन्ही सलामीवीरांनी आपल्या कामगिरीनिशी निवड समितीला विचार करायला प्रवृत्त केले आहे.
पोटदुखीमुळे इराणी सामन्यातून माघार घेणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या अनुपस्थितीत शेष भारताच्या नेतृत्वाची धुरा हरभजन सिंगकडे सोपविण्यात आली. त्यानंतर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. परंतु चांगल्या सलामीनंतर विजयने मनोज तिवारी (३७)सोबत दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली आणि संघाला द्विशतकापल्याड नेले. मग सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. या महत्त्वाच्या भागीदाऱ्यांमुळे शेष भारताला पहिल्या दिवशीच सव्वातीनशेपर्यंत मजल मारता आली. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने धवनला बाद करून सलामीची जोडी फोडली. मुंबईचा कर्णधार मध्यमगती गोलंदाज अभिषेक नायरने विजय आणि मनोज तिवारी अशा दोन महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. नायरचा तिसरा स्पेल (९-५-१६-२) शेष भारतासाठी धोकादायक ठरला. कामचलाऊ गोलंदाज रोहित शर्माने अंबाती रायुडूला पहिल्या स्लिपमध्ये वासिम जाफरकडे झेल देण्यास भाग पाडले. उत्तरार्धात धवल कुलकर्णीने वृद्धिमान साहा (१७) पायचीत असल्याचा कौल मिळवला.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत (पहिला डाव) : ९० षटकांत ५ बाद ३३० (मुरली विजय ११६, शिखर धवन ६३, मुरली विजय ३७, अंबाती रायुडू ५१, सुरेश रैना खेळत आहे ३६; अभिषेक नायर २/४९).