अपेक्षेप्रमाणेच शेष भारताच्या खात्यावर आतापर्यंतचा २६वा इराणी करंडक जमा झाला. यंदाच्या रणजी मोसमात ‘मुंबई चालिसा’चा इतिहास रचणारा मुंबईचा संघ शेष भारतापुढे नाम‘शेष’ ठरला. पण चौथ्या दिवसाच्या या नीरस खेळातही मुंबईचा सलामीवीर वसिम जाफरने झळकावलेले शतक ‘विशेष’ महत्त्वाचे ठरले. यंदाच्या स्थानिक हंगामात सातत्याने धावा काढणाऱ्या जाफरने पहिल्या डावात ८० आणि दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावा काढूनही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरला. याशिवाय अंबाती रायुडूची नाबाद दीड शतकी खेळी, सुरेश रैनाचे धडाकेबाज अर्धशतक आणि निवड सार्थ ठरविणारी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगची गोलंदाजी ही इराणी करंडक सामन्याच्या पाचव्या दिवसाची वैशिष्टय़े ठरली.
दोन दिग्गज संघांमधील इराणी करंडक सामना अपेक्षेप्रमाणेच अनिर्णित राहिला, परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर शेष भारताने विजेतेपदावर नाव कोरले. रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रात अंबाती रायुडू आणि सुरेश रैना यांनी पाचव्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी रचून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या रैनाने दुसऱ्या डावातसुद्धा झोकात फलंदाजी करीत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७१ धावा केल्या. रायुडूने नाबाद १५६ धावांची शानदार खेळी साकारली. शेष भारताने आपला दुसरा डाव ५ बाद ३८९ धावसंख्येवर एकंदर ५०६ धावांच्या आघाडीसह घोषित केला.
त्यानंतर जाफरच्या आणखी एका नजाकतभऱ्या खेळीने वानखेडे स्टेडियमवर रविवारी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जाफरने २०० मिनिटे खेळपट्टीवर टिकाव धरून १० चौकारांसह १४१ चेंडूंत आपली शतकी खेळी फुलवली. मुंबईचा दुसरा डाव गुंडाळून निर्णायक विजय मिळविण्याच्या अपेक्षेने शेष भारताने तब्बल नऊ गोलंदाज वापरले, पण मुंबईने ५४ षटकांत ४ बाद १६० धावसंख्येपर्यंत मजल मारल्यानंतर हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. अखेरच्या दिवशी हरभजनने लाजवाब गोलंदाजी करीत सर्वाचे लक्ष वेधले. १६-१-३८-२ असे हरभजनचे प्रभावी पृथक्करण होते.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत (पहिला डाव) : ५२६
मुंबई (पहिला डाव) : ४०९
शेष भारत (दुसरा डाव) : १२० षटकांत ५ बाद ३८९ डाव घोषित (मनोज तिवारी ६९, अंबाती रायुडू नाबाद १५६, सुरेश रैना ७१; विशाल दाभोळकर २/९७)
मुंबई (दुसरा डाव) : ५४ षटकांत ४ बाद १६० (वसिम जाफर नाबाद १०१; हरभजन सिंग २/३८)
सामनावीर : सुरेश रैना.