आठवडय़ाची मुलाखत : चमिंडा वास श्रीलंकेचा माजी गोलंदाज
श्रीलंकेचा आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून आपण चमिंडा वासचे नाव निश्चितच घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती पत्करल्यावरही वासने आपली तंदुरुस्ती चांगली राखली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी तो भारतात आला होता. या वेळी त्याने श्रीलंकेचे क्रिकेट, प्रशासकांचा खेळातील हस्तक्षेप, देशापेक्षा आयपीएल प्रिय असलेला मलिंगा, विराट कोहलीचा भन्नाट फॉर्म याविषयी आपली मते व्यक्त केली. त्याच्याशी केलेली ही खास बातचीत-
* आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यावरही तू अजूनही तंदुरुस्त आहेस, याचे गुपित काय?
क्रिकेट हाच माझा ध्यास आहे. श्रीलंकेकडून मला क्रिकेट खेळण्याचे सौभाग्य मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी मी सर्वोत्तम कामगिरी केली. पण आता निवृत्तीनंतरही मी क्रिकेटपासून लांब राहू शकत नाही. मी दिवसाला ३-४ तास सराव करतो, त्यामुळेच मी तंदुरुस्त राहू शकलो आहे.
* एके काळी श्रीलंकेच्या संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. पण सध्याच्या घडीला श्रीलंकेचा संघ बलाढय़ वाटत नाही, याबद्दल काय वाटते?
एके काळी संघात अर्जुन रणतुंगा, अरविंद डी’सिल्व्हा, सनथ जयसूर्या, रोमेश कालुवितरणा, हसन तिलकरत्ने, रोशन महानामा, मुथय्या मुरलीधरन असे दिग्गज होते. त्यानंतर कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशानसारखे चांगले खेळाडू संघात होते. सध्याच्या घडीला तसे दिसत नाही. कारण श्रीलंकेच्या संघात बदल होत आहेत. सध्याच्या घडीला संघात युवा खेळाडू आहेत. आपण त्यांना काही वेळ द्यायला हवा. दोन वर्षांमध्ये चांगली संघबांधणी झाली तर हा संघही बलाढय़ होऊ शकतो.
* ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी संघामध्ये प्रशासकांनी काही बदल केले, त्याबद्दल काय वाटते?
माझे व्यक्तिश: मत असे आहे की, प्रशासकांनी खेळात हस्तक्षेप करू नये. त्यांनी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि खेळाडूंना स्वातंत्र्य द्यायला हवे. ९० यार्डाचे मैदान हे खेळाडूंसाठी व्यासपीठ असते. त्यामध्ये खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी कामगिरी चांगली होते तर कधी होत नाही. प्रत्येक परिस्थिती सारखी कधीच नसते. त्यामुळे खेळाडूंचा खेळ, त्यांची निवड यामध्ये प्रशासकांनी आपली मते आणू नयेत. जेव्हा खेळावर प्रशासक वरचढ होतात, तेव्हा कधीही चांगला खेळ होऊ शकत नाही.
* लसिथ मलिंगा सध्या देशाकडून कमी आणि आयपीएलमध्ये जास्त खेळताना दिसतो, याबद्दल तुझे मत काय?
माझ्या मते मलिंगाने देशासाठी बरेच काही केले आहे. बरीच वर्षे त्याने देशाची सेवा केली आहे. त्यामुळे त्याला नेमके काय करावेसे वाटते, हे त्याच्यावर सोपवायला हवे. त्याला जर आयपीएल खेळावेसे वाटत असेल तर त्याला परवानगी द्यायला हवी.
* सध्याच्या सुरू असलेल्या आयपीएलबद्दल काय सांगशील?
आयपीएल हे क्रिकेटपटूंसाठी उत्तम व्यासपीठ आहे. खासकरून युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची या स्पर्धेद्वारे संधी मिळते, त्याचबरोबर त्यांना पैसाही मिळतो. पण युवा खेळाडूंनी फक्त पैशाच्या मोहात अडकता कामा नये. त्यांनी त्यांचे ध्येय ठरवायला हवे आणि त्यासाठी अथक मेहनत घ्यायला हवी. पैशापेक्षा बरेच काही कमावण्यासारखे क्रिकेटमध्ये आहे.
* सध्याच्या घडीला विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे, तू जर खेळत असला असतास तर त्याला कसे बाद केले असतेस?
भारताने बरेच दिग्गज खेळाडू दिले. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समृद्ध केले. पण कोहली हा त्यांच्यापेक्षा मला वेगळा वाटतो. कारण सध्याच्या घडीला तो भन्नाट फॉर्मात आहे आणि प्रत्येक सामन्यांमध्ये अद्भुत कामगिरी करीत आहे. कोहलीला बाद करणे सोपे नाही. कारण कोणताही गोलंदाज त्याला बाद करण्याची हमी देऊ शकत नाही. माझ्या मते मैदानात फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये द्वंद्व रंगत नसते, तर चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये सामना होत असतो. कधी चेंडू जिंकतो तर कधी बॅट. पण जर सातत्याने चांगले चेंडू टाकले तर कोहलीला बाद करता येऊ शकते.