भरवशाचा फलंदाज शिवनारायण चंदरपॉल आणि सलामीवीर किरान पॉवेल यांच्या शतकांच्या बळावर ढाक्यामधील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या दिवशी दमदार मजल मारली आहे. कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक साकारणारा चंदरपॉल १२३ धावांवर खेळत आहे, तर पॉवेलने ११७ धावा केल्या. त्यामुळेच कप्तान डॅरेन सामीने नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरविताना वेस्ट इंडिजने ४ बाद ३६१ अशी मजल मारली.
उपाहाराला वेस्ट इंडिजच्या धावफलकावर ३ बाद १०६ धावा झाल्या असताना ३८ वर्षीय चंदरपॉल पॉवेलच्या साथीला आला. शेर-ए-बांगलाच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर बांगलादेशने प्रारंभी मिळवलेले वर्चस्व भेदून चंदरपॉलने आपल्या युवा साथीदारालाही छान मार्गदर्शन केले. चंदरपॉलने पॉवेलसोबत चौथ्या विकेटसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर चंदरपॉलने दिनेश रामदिनसोबत पाचव्या विकेटसाठी १३० धावांची नाबाद भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा रामदिन ५२ धावांवर खेळत होता.
पहिल्या तासाभराच्या खेळात बांगलादेशने सामन्यावर चांगले प्रभुत्व मिळवले होते. पदार्पणवीर ऑफ-स्पिनर सोहाग गाझीने नवा चेंडू हाताळताना ख्रिस गेल (२४) आणि डॅरेन ब्राव्हो (१४) यांना तंबूची वाट दाखवली. त्यानंतर वेगवान गोलंदाज शहदात हुसेन याने मार्लन सॅम्युएल्सला १६ धावांवर बाद केले. त्यानंतर पॉवेल आणि चॅदरपॉल यांनी जबाबदारीने खेळत चहापानाला ३ बाद २२३ अशी मजल मारली.