हरयाणातील भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाने केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप व्यक्त होतोय. सोशल मीडियावर सक्रिय असणारा भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही ट्विटरवरुन या घटनेचा निषेध केलाय. एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या गाडीचा रात्री उशिरा पाठलाग करुन तिची छेडछाड करण्याचा प्रकार लज्जास्पद असल्याचे त्याने म्हटलंय. एवढेच नाही तर कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे सांगत या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी, अशी भावनाही सेहवागने व्यक्त केली. तुम्ही कोणीपण असाल कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल, अशा शब्दांत सेहवागने हरयाणा घटनेतील आरोपींना अप्रत्यक्षरित्या सुनावले.

हरयाणातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या कारचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला (वय २३) आणि त्याचा मित्र आशिष कुमार (वय २७) या दोघांची अटकेनंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सर्व स्तरातून सुभाष बराला यांच्यावर टीका होत आहे. बड्या नेत्याच्या मुलगा असला तरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी, असा सूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. चंदिगढ पोलिसांना या घटनेप्रकरणातील संबंधित सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, यात आरोपी विकासची कार पीडित तरुणीच्या कारचा पाठलाग करताना दिसते आहे. पोलिसांनी या फुटेजविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, आणखी सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर गरज भासल्यास आरोपपत्रात आणखी कलमे दाखल केली जातील, असे पोलिसांनी सांगितले.