इंग्लंड दौऱ्यात विराट कोहलीला चार कसोटी सामन्यांपैकी एका लढतीतही अर्धशतकी खेळी साकारता आली नव्हती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापासून कोहलीने धावांची टांकसाळ उघडली. या दौऱ्यानंतर मी तंत्रामध्ये बदल केला, असे दस्तुरखुद्द कोहलीने सांगितले.

इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांना ‘बीसीसीआय.टीव्ही’साठी दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीने बऱ्याच विषयांवर भाष्य केले. ‘इंग्लंडच्या २०१४ साली झालेल्या मालिकेत मी स्वत:वर भरपूर दडपण घेतले होते. आशिया खंडातील खेळाडू बऱ्याचदा परदेशातील काही देशांमध्ये खेळण्याचे अधिक दडपण घेत असतात. या देशांमध्ये चांगली कामगिरी झाली, तरच तुम्ही चांगले क्रिकेटपटू आहात, असे समजले जाते. या देशांमध्ये चांगली कामगिरी झाली नाही की तुमचे खच्चीकरण व्हायला सुरुवात होते,’ असे कोहली म्हणाला.

या दौऱ्यात नेमके काय चुकले, या प्रश्नावर कोहली म्हणाला की, ‘ इंग्लंडमध्ये खेळताना मला जास्त ‘इनस्विंगर’ येतील, असे मला वाटले होते, पण तसे झाले नाही. या दौऱ्यात मला जास्त चेंडू ‘आऊटस्विंगर’ टाकले गेले आणि त्यामुळे मी झटपट बाद होत गेलो.’

तंत्रातील काही बदलांबद्दल कोहली म्हणाला की, ‘मी सुरुवातीला मधल्या यष्टीच्या पुढे उभा राहायचो, त्यामुळे चेंडू खेळताना माझा पाय कव्हरच्या दिशेने जायचा, खरे तर तो पॉइंटच्या दिशेने जायला हवा. त्यामुळे मला खांदे मोकळे करायला मिळत नव्हते. पण या गोष्टींतून बरेच काही शिकलो. या दौऱ्यानंतर मी माझ्या खेळाचे ध्वनिमुद्रण करायला सुरुवात केली. मी खेळताना, पाय, हात, डोके, खांदे, बॅट कशी कुठून जाते, याचे मी मूल्यमापन केले. त्यानंतर चेंडू खेळताना माझा पाय पॉइंटच्या दिशेने कसा जाईल, यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे आता कोणत्याही चेंडूचा त्रास होत नाही.’

सकारात्मक वृत्तीच्या खेळामुळेच विजयी

पराभवाच्या छायेतून संघास बाहेर काढायचे असेल तर सकारात्मक वृत्तीनेच खेळले पाहिजे हे लक्षात घेऊनच केदार जाधव व मी आम्ही दोघांनी आत्मविश्वासाने खेळ केला. त्यामुळेच आम्हाला इंग्लंडवर मात करता आली, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने येथे सांगितले.

केदारच्या शतकाचे कौतुक करीत कोहली म्हणाला, तो खेळावयास आल्यानंतर आम्ही नियोजनबद्ध खेळ करण्यावर भर दिला. चांगल्या चेंडूंना समर्थपणे तोंड द्यायचे व सोप्या चेंडूला सीमापार करायचे. त्याचप्रमाणे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू तटवीत एकेरी व दुहेरी धावाही मिळवायच्या असे आम्ही ठरविले होते. सुदैवाने आमचे नियोजन यशस्वी झाले. केदारने मारलेले अनेक फटके अद्वितीय होते. त्याच्या फटकेबाजीने मलादेखील थक्क केले. त्याने परिस्थितीचे गांभीर्य पाहून खेळ केला. आमच्या खेळातही काही चुका झाल्या, मात्र काही वेळा असे धोके पत्करणे अपरिहार्य होते. आम्ही फलंदाजी करीत असताना खेळपट्टी फलंदाजीस पोषकच होती.

संघास विजय मिळवून देणे हेच आमच्यापुढे एकमेव ध्येय होते. अशा वेळी तुम्ही कशी फटकेबाजी करता हे महत्त्वाचे नसून, आवश्यक धावा कशा मिळविता येतील याचाच विचार करावा लागतो. त्या वेळी तंत्रशुद्ध शैलीऐवजी उपयुक्त फटकेबाजीस प्राधान्य असते. त्यामुळेच की काय मी जेव्हा माझ्या फटकेबाजीचे चित्रण पाहिले, तेव्हा आपण असे फटके मारू शकतो याची जाणीव मला झाली असे कोहली याने सांगितले.