रणजी सामने निकाली ठरण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील तांत्रिक समितीने काही बदल सुचवले आहेत. गुण पद्धती आणि एक दिवसातील षटकांची संख्या याबाबत हे बदल अपेक्षित आहेत. बीसीसीआयच्या २६ एप्रिलला होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला  प्राथमिक सूचनांवर चर्चा करण्यात येईल.
मागील हंगामातील ११५ रणजी सामन्यांपैकी ६२ सामने निकाली ठरले होते. प्रत्येक दिवशी पाच षटकांचा खेळ अधिक झाल्यास निर्णायकता अधिक वाढू शकेल, असे तांत्रिक समितीचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी ९६ षटकांचा खेळ होतो.  सध्या बहुतांशी संघ पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुण मिळवून सामना अनिर्णीत राखण्यात धन्यता मानतात, तर अन्य संघाला एक गुण मिळतो. परंतु आक्रमक क्रिकेट व्हावे, या हेतूने अनिर्णीत सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण देण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

समितीच्या शिफारशी
* तांत्रिक समितीने चार आणि पाच दिवसांच्या रणजी करंडक सामन्यांसाठी प्रत्येक दिवशी ९० ऐवजी ९५ षटके टाकण्यात यावीत.
* पहिल्या डावातील आघाडी घेऊनही सामना अनिर्णीत राखणाऱ्या संघाला एक गुण देण्यात यावा.