सध्याच्या युगात शेजारील दोन देश गुण्यागोविंदाने संसार थाटतात, असे चित्र तरी अभावानेच पाहायला मिळते. कोणत्या, ना कोणत्या कारणाने या सख्ख्या शेजारी राष्ट्रांमध्ये कायम कुरबुरी सुरू असतात. याच k03कट्टर वैरी असलेल्या राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी मग खेळाचा मार्ग अवलंबला जातो. भारत-पाकिस्तान हे त्याचे ताजे उदाहरण. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाच्या मार्गातूनच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या कट्टर राष्ट्रांमध्ये काही काळासाठी का असेना, पण सलोख्याचा मार्ग निवडण्यात आला. ब्राझीलमध्ये झालेल्या कॉन्फेडरेशन चषकानंतर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दरम्यान ब्राझीलवासीयांनी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी, मागण्यांसाठी सरकारविरोधात लढा दिला; पण कधी-कधी राजकीय वातावरण तापवले जाण्यासाठी खेळाचा वापरही केला जातो. सध्या सर्बिया आणि अल्बेनिया यांच्यातील रद्द झालेल्या सामन्याची चर्चा जोरात सुरू आहे. सर्बिया आणि अल्बेनिया यांच्यात युरो चषकाच्या पात्रता फेरीतील सामना रद्द होण्यामागे राजकीय तणाव कारणीभूत ठरला. खेळ आणि राजकारणाची सरमिसळ केली, की खेळभावनेचा बट्टय़ाबोळ होणार, हे स्वाभाविकच आहे.
या दोन्ही देशांमधील राजकीय सुंदोपसुंदी लक्षात घेता, सर्बिया आणि अल्बेनिया यांच्यातील सामन्याकरिता कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी अल्बेनियाच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. सामना सुरळीतपणे सुरू असताना पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी अल्बेनियाच्या झेंडय़ाविरोधी टिपण्णी करणारे एक स्वयंचलित विमान मैदानात येऊन धडकले. सर्बियाचा खेळाडू स्टेफान मित्रोव्हिचने हा झेंडा हटवण्याचा प्रयत्न केला; पण त्यानंतर मैदानावरील चाहते, खेळाडू, अधिकारी यांच्यात तुंबळ युद्ध रंगले. एका चाहत्याने स्टेडियममध्ये धावत येऊन अल्बेनियाचा खेळाडू बेकिम बलाज याच्या डोक्यात खुर्ची घातली. त्यानंतर अल्बेनियाचा कर्णधार लोरिक काना याने त्या चाहत्याच्या अंगावर झेप घेऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी अल्बेनियाच्या खेळाडूंना स्टेडियमच्या आत जाण्यास सांगितले; पण बघ्याची भूमिका घेणाऱ्या सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी आत जाताना खेळाडूंवर हल्ला केला. अल्बेनियाच्या खेळाडूंनी पुन्हा मैदानावर उतरण्यास नकार दिल्यामुळे अखेर इंग्लंडचे रेफ्री मार्टिन अ‍ॅटकिन्सन यांना सामना रद्द करावा लागला.
राजकीय वातावरण ढवळून काढण्यासाठी खेळाचा वापर करण्यात आल्याची ही पहिली घटना नक्कीच नव्हती. याआधीही राजकीय वादामुळे अनेक वेळा क्रीडा क्षेत्र हादरून निघाले आहे. १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान सोव्हिएत युनियन आणि हंगेरी यांच्यातील वॉटरपोलोचा सामना हा ‘ब्लड इन द वॉटर’ या नावाने ओळखला जातो. बुडापेस्टमधील साम्यवादी आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोव्हिएतच्या फौजांनी मदत केल्याची घटना ताजी असतानाच, हंगेरीच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी सामन्यादरम्यान टोमणे मारण्यास सुरुवात केल्यानंतर नव्या वादाला ठिणगी पडली. या घटनेवर आधारित ‘फ्रीडम्स फ्युरी’ हा माहितीपट तसेच ‘चिल्ड्रन ऑफ ग्लोरी’ हा चित्रपट निघाला होता. १९७२च्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान शस्त्रधारी पॅलेस्टाइन समूहाने इस्रायलच्या नऊ खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांना ओलीस धरले होते. इस्रायलमध्ये कैद असलेल्या २३४ जणांना सोडण्याची मागणी त्यांनी केली होती; पण या खेळाडूंची सुटका करताना मात्र सर्वाना प्राण गमवावा लागला होता. लंडनमध्ये स्पर्धेसाठी बसमधून प्रवास करत असताना सर्व श्वेतवर्णीय खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाच्या बसचे वर्णद्वेषीविरोधी आंदोलकांनी अपहरण केले होते. उपकर्णधार टॉमी स्मिथने बसचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा १९७०मधील इंग्लंड दौरा रद्द करण्यात आला होता.
२००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे पाकिस्तानबरोबरचे संबंध बिघडले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. पाकिस्तानातील गोंधळलेल्या राजकीय परिस्थितीनंतर कोणताही संघ पाकिस्तानात जाण्यास तयार नव्हता. भारताने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताच्या जागी श्रीलंकेला पाचारण करण्यात आले. २००९साली झालेल्या या दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूंना राष्ट्रपती दर्जाची सुरक्षा देण्यात आली; पण लाहोर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ तिसऱ्या दिवसाच्या खेळासाठी जात असताना गदाफी स्टेडियमच्या बाहेर जवळपास १२ शस्त्रधारी दहशतवाद्यांनी श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सात खेळाडूंना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेचा संघ दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. त्यानंतर आतापर्यंत एकाही संघाने पाकिस्तानात जाण्याचे धारिष्टय़ दाखवले नाही. आता सर्बिया आणि अल्बेनिया यांच्यातील ड्रोन हल्ल्याने पुन्हा एकदा क्रीडाविश्व हादरले आहे. खेळ हा दोन देशांना एकत्र आणणारा दुवा मानला जातो; पण याच खेळाचा वापर वाईट कारणासाठी करण्यात आला, तर खेळभावनेचा बट्टय़ाबोळ झाला म्हणून समजाच!

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…