न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीत आपण हस्तक्षेप केल्याचा आरोप खोडसाळपणाचा आहे, असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारून लॉरगेट यांनी सांगितले.
संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांना सामन्याच्या दिवशी पहाटे लॉरगेट यांनी संपर्क साधून अंतिम संघ कोणता असावा, ही सूचना केली असल्याचे वृत्त येथील एका दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. लॉरगेट यांच्या सूचनेनुसार व्हरनॉन फिलँडरला कायले अॅबॉटच्या जागी स्थान देण्यात आल्याचे वृत्तही देण्यात आले आहे. त्या वृत्ताचा इन्कार करीत लॉरगेट म्हणाले, ‘‘अंतिम संघनिवडीचे अधिकार सर्वस्वी संघाचे प्रशिक्षक व कर्णधार यांना देण्यात आले होते. तसेच अंतिम ११ खेळाडूंची निवड जाहीर झाली असताना त्यामध्ये मी कशाला ढवळाढवळ करीन.’’
लॉरगेट पुढे म्हणाले, ‘‘या वृत्ताबाबत उत्तर देण्याची जबाबदारी आमच्या मंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे आहे, मात्र या वृत्ताने आमच्या संघाची व मंडळाची विनाकारण बदनामी झाली आहे. आमच्या संघाने उपांत्य फेरीत निसटता पराभव स्वीकारला असला तरी आमच्या खेळाडूंनी यंदा खूपच चांगली कामगिरी केली आहे. वृत्तपत्रातील खोडसाळ वृत्ताने त्यांच्या कामगिरीवर पाणी फिरवले जाऊ नये म्हणूनच मी स्वत: या वृत्ताचे खंडन केले आहे.’’