भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला ग्रेन्क क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्स याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत आनंदला आतापर्यंत फारसे नेत्रदीपक यश मिळविता आलेले नाही. त्याला जर्मनीच्या डॅनियल फ्रिडमन याच्याविरुद्धच्या डावात विजयी स्थितीतून बरोबरी पत्करावी लागली होती. फॅबिआनो कारुआना याला मागे टाकण्यासाठी आनंदला अ‍ॅडम्सविरुद्धच्या डावात विजय मिळविणे आवश्यक आहे. कारुआना याचे साडेतीन गुण झाले आहेत, तर आनंदचे तीन गुण झाले आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या लंडन क्लासिक स्पर्धेत अ‍ॅडम्सने आनंदवर सनसनाटी मात केली होती. त्यामुळेच या लढतीत आनंदला काळजीपूर्वक चाली कराव्या लागतील.