इंग्लिश प्रीमिअर लीगचे (इपीएल)जेतेपद आणि चेल्सी यांच्यातील अडथळा ईडन हेझार्डने रविवारी दूर केला. हेझार्डने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर चेल्सीने क्रिस्टल पॅलेसविरुद्धच्या लढतीत १-० असा विजय साजरा करून चौथ्यांदा ईपीएलचा चषक उंचावला.
गत आठवडय़ात लिचेस्टर सिटी संघाला पराभूत केल्यानंतर केवळ तिन गुण मिळवल्यास जेतेपद आपलेच असेल, याची खात्री चेल्सीचे व्यवस्थापक जोस मॉरिन्हो यांना होती. त्यांनी स्टॅम्पफोर्ड ब्रिज स्टेडियमवर हा विजय मिळवत २०१०नंतर पहिल्यांदा ईपीएलचे जेतपेद आपल्या नावावर केले.  ४५व्या मिनिटाला चेल्सीला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करण्यासाठी हेझार्ड सरसावला, परंतु पॅलेसचा गोलरक्षक ज्युलियन स्पेरोनी याने तो चेंडू अडवला. मात्र, स्पेरोनीला चेंडू आपल्या हातात ठेवता आला नाही आणि हेझार्डने हीच संधी हेरून पुन्हा चेंडू गोलजाळ्यात पोहोचवला.  हा गोल अखेरीस निर्णायक ठरला.