मैदानाबाहेरील घडामोडींमुळे गेले वर्षभर चर्चेत राहिलेल्या दोन वेळा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ शुक्रवारी सातव्या हंगामाला प्रारंभ करणार आहे. नव्या खेळाडूंसह उतरणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी त्यांची पहिल्याच लढतीत गाठ पडणार आहे.
गेली काही वष्रे चेन्नईच्या संघाचे आयपीएल स्पध्रेवर वर्चस्व दिसून आहे. परंतु मागील वर्षी जगासमोर आलेल्या स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे या संघाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांचे पदाधिकारी या प्रकरणात अडकले असताना काही खेळाडूंची नावेही चर्चेत आहेत.
मैदानाबाहेरील गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो, असे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मान्य केले. तो म्हणाला, ‘‘मैदानाबाहेर बरेच काही चालू आहे, मी खोटे बोलत नाही. त्यामुळेच त्याकडे लक्ष वेधले जाते. आम्ही सर्वच जण संघ खेळू शकेल का, याविषयी अनिश्चित होतो.’’
चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा त्यांच्या आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय उतरत आहे. ऑस्ट्रेलियाचा मायकेल हसी आणि दक्षिण आफ्रिकेचा अ‍ॅल्बी मॉर्केल या खेळाडूंना चेन्नईने लिलावामध्ये गमावले आहे. परंतु ब्रेन्डन मॅक्क्युलमसारखा खेळाडू त्यांच्या ताफ्यात सामील झाला आहे. गोलंदाजीत वेस्ट इंडिजचा लेग-स्पिनर सॅम्युअल बद्री चेन्नईसाठी उपयुक्त ठरेल.
ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली उतरणारा किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ कागदावर तरी समतोल भासत आहे. कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या वीरेंद्र सेहवागवर त्यांचा भरवसा असेल. याचप्रमाणे वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन, फलंदाज शॉन मार्श पंजाबचे नशीब पालटतील अशी आशा आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, आर. अश्विऩ, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, ब्रेन्डन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, आशीष नेहरा, मोहित शर्मा, सॅम्युअल बद्री, बेन हिल्फेनहॉस, मॅट हेन्री, बाबा अपराजित, मिथुन मिन्हास, ईश्वर पांडे, पवन नेगी, विजय शंकर, रोनित मोरे, जॉन हॅस्टिंग्स.
किंग्ज इलेव्हन पंजाब : जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड मिलीर, मनन व्होरा, वीरेंद्र सेहवाग, मिचेल जॉन्सन, चेतेश्वर पुजारा, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, थिसारा परेरा, ग्लेन मॅक्सवेल, रिशी धवन, अनुरित सिंग, संदीप शर्मा, अक्षर पटेल, ब्युरान हेंड्रिक्स, करणवीर सिंग, मुरली कार्तिक, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, लक्ष्मीपती बालाजी, परविंदर अवाना, गुरकीराटसिंग मान, मनदीप सिंग.