गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नसून त्यांची तिसऱ्या सामन्यात गाठ पडणार आहे ती चेन्नई सुपर किंग्जशी. चेन्नईने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दोन्ही लढती जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, तर मुंबईला दोन्ही लढती गमवाव्या लागल्याने ते गुणतालिकेत तळापासून दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे या सामन्यात मुंबईसाठी विजयाचे दार उघडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुंबईला अजूनही फलंदाजीमध्ये लय सापडलेली नाही. मायकेल हसीला सलामीसाठी पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न आतापर्यंत फसला आहे. त्यामुळे रोहितने सलामीला येऊन जर हसीला मधल्या फळीत पाठवले तर संघाच्या पथ्यावर पडू शकते. किरॉन पोलार्ड आणि कोरे अ‍ॅन्डरसन यांना अजूनही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये झहीर खान आणि लसिथ मलिंगा चांगल्या फॉर्मात आहेत. चेन्नईकडे रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू असून तो चांगल्या फॉर्मात आहे. पण फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्यांना सातत्य ठेवता आलेले नाही.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, अंबाती रायुडू, माइक हसी, झहीर खान, प्रग्यान ओझा, कोरे अ‍ॅन्डरसन, जोश हॅझलवूड, सीएम गौतम, आदित्य तरे, अपूर्व वानखेडे, मर्चंट डी लँग, क्रिशमर सॅन्टोकी, जसप्रीत बुमराह, बेन डंक, पवन सुयल, सुशांत मराठे, श्रेयस गोपाल आणि सलाज सक्सेना.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, आर. अश्विऩ, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, ब्रेन्डन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, आशीष नेहरा, मोहित शर्मा, सॅम्युअल बद्री, बेन हिल्फेनहॉस, मॅट हेन्री, बाबा अपराजित, मिथुन मिन्हास, ईश्वर पांडे, पवन नेगी, विजय शंकर, रोनित मोरे, जॉन हॅस्टिंग्स.