इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील चेन्नई फ्रँचायझीच्या ब्राझीलचा माजी अव्वल फुटबॉलपटू रोनाल्डिन्होला करारबद्ध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रोनाल्डिन्होने होकार दिला तर आयएसएलमध्ये खेळणारा तो स्टार फुटबॉलपटू ठरणार आहे.
चेन्नई संघाचे सहमालक अभिषेक बच्चन किंवा तांत्रिक समितीकडून बार्सिलोनाचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्होशी संपर्क साधण्यात आलेला नाही. तर खेळाडूंचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय समितीने रोनाल्डिन्होचा भाऊ आणि व्यवस्थापक रॉबेटरे डी असिस याच्याशी संपर्क साधलेला आहे. ‘‘पुढील बोलणी करण्यासाठी रोनाल्डिन्होचा भाऊ भारतात येणार आहे का, अथवा आमच्याकडून कुणी तरी ब्राझीलमध्ये यावे, यासाठी आम्ही रॉबेटरेकडून प्रत्युत्तराची वाट पाहत आहोत. रॉबेटरेने होकार कळवल्यास, आम्हाला पुढील पावले उचलावी लागतील,’’ असे सूत्रांनी सांगितले.
मात्र रॉबेटरेला याविषयी अद्याप कोणतीच माहिती नाही. ‘‘याविषयी मी आता काहीच बोलू शकत नाही,’’ असे रॉबेटरेने सांगितले. दोन वेळा ब्राझीलला विश्वचषक जिंकून देणाऱ्या रोनाल्डिन्होची गेल्या आठवडय़ात पाल्मेरास या ब्राझीलच्या क्लबशी सुरू असलेली बोलणी फिस्कटली. त्यानंतर लगेचच चेन्नई फ्रँचायझीने रोनाल्डिन्होला करारबद्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या. दोन वर्षांसाठी करारबद्ध करताना रोनाल्डिन्होला १८ कोटी रुपये देण्यास चेन्नई संघ तयार आहे. तसेच करारातील १० टक्के रक्कम आणि त्याच्या आगमनानंतर पुरस्कर्त्यांचा आलेला ओघ यातील काही वाटा त्याला देण्यास चेन्नईची तयारी आहे.