शेष भारत संघ ९ बाद २०६; चिरागच्या दीडशतकामुळे गुजरातच्या ३५८ धावा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस गुजरातने गाजवला, अपवाद ठरला तो फक्त शेष भारत संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा. गुजरातने चिराग गांधीच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३५८ धावांची मजल मारली. त्यानंतर शेष भारत संघाची पहिल्या डावात ९ बाद २०६ अशी अवस्था त्यांनी केली आहे. त्यामुळे गुजरातचा संघ आघाडी समीप आहे. पुजाराने या वेळी एकाकी झुंज देत संघाचे आव्हान टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शतक झळकावण्यात अपयश आले. दुसऱ्या दिवसअखेर शेष भारत संघ १५२ धावांनी पिछाडीवर असून त्यांची शेवटची जोडी मैदानात आहे.

चिरागने दुसऱ्या दिवशीही चांगली फटकेबाजी करत दीडशतक पूर्ण केले; पण वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने त्याला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करत शेष भारत संघाला मोठे यश मिळवून दिले. चिरागला बाद करत कौलने डावातील पाच बळी पूर्ण केले. चिरागने या वेळी २२ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १६९ धावा केल्या. शेष भारत संघाकडून कौलने पाच आणि वेगवान गोलंदाज पंकज सिंगने चार बळी मिळवले.

गुजरातच्या धावांचा पाठलाग करणाऱ्या शेष भारत संघाची सुरुवात चांगली झाली नाही; पण त्यानंतर अखिल हेरवाडकर (४८) आणि पुजारा यांची छान जोडी जमली. ही जोडी शेष भारत संघाला महत्त्वपूर्ण भागीदारी रचून देईल असे वाटत असतानाच फिरकीपटू हार्दिक पटेलने अखिलला बाद केले. या वेळी अखिलचे अर्धशतक दोन धावांनी हुकले.

अखिलनंतर करुण नायर (२८), मनोज तिवारी (१२) आणि वृद्धिमान साहा (०) असे भारतीय संघाचा अनुभव असलेले फलंदाज होते, पण या तिघांनीही निराशा केली आणि त्यामुळेच शेष भारत संघाचा डाव अडचणीत आला. एकामागून एक फलंदाज बाद होत असताना पुजारा मात्र संघाची धावसंख्या वाढवण्याचे काम करत होता. हे तिन्ही फलंदाज बाद झाल्यावर पुजाराने खेळपट्टीवर तग धरून राहायला हवे होते, पण तसे झाले नाही. ईश्वर चौधरीच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुजाराने आपली विकेट आंदण दिली. एकाकी लढत देत पुजाराने ११ चौकारांच्या जोरावर ८६ धावांची खेळी साकारली. गुजरातकडून चिंतन गाजा आणि पटेल यांनी प्रत्येक तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

  • गुजरात (पहिला डाव) : १०२.५ षटकांत सर्वबाद ३५८ (चिराग गांधी १६९; सिद्धार्थ कौल ५/८६).
  • शेष भारत (पहिला डाव) : ७२ षटकांत ९ बाद २०६ (चेतेश्वर पुजारा ८६; चिंतन गाजा ३/४६, हार्दिक पटेल ३/७३).

untitled-25