प्रत्येक खेळाडूचं आयुष्य घडवण्यासाठी त्याच्या परिवारातला एक माणून आपलं आयुष्य खर्ची घालतं असतो. अजित तेंडुलकरने लहानपणी सचिनच्या खेळाकडे विशेष लक्ष दिलं, त्यामुळे आज सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या विश्वातला तारा बनला. राहुल द्रवीडच्या निवृत्तीनंतर संघात त्याची जागा घेतलेल्या चेतेश्वर पुजारासाठीही त्याच्या वडिलांनी विशेष मेहनत घेतली आहे. मुलाखतकार विक्रम साठ्ये यांच्या ‘व्हॉट द डक’ या कार्यक्रमात बोलताना चेतेश्वर पुजाराने आपलं आणि आपल्या वडिलांशी असलेलं नात उलगडवून दाखवलं.

आपला खेळ सुधारावा यासाठी लहानपणापासून वडिलांनी विशेष मेहनत घेतल्याचं पुजाराने यावेळी नमूद केलं. गल्ली क्रिकेट हा प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतो. किंबहुना सचिनही आपल्या लहानपणी गल्ली क्रिकेट खेळतानाचे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. मात्र आपल्या वडिलांनी आपल्याला कधीच गल्ली क्रिकेट खेळू दिलं नाही, असं पुजाराने सांगितलं. ” गल्ली क्रिकेटमध्ये सहसा टेनीस बॉलचा वापर होतो. मात्र सिझन बॉलला मिळणारी उसळी आणि टेनीस बॉलला मिळणारी उसळी यात फरक असतो. त्यामुळे मी टेनीस बॉलने खेळलो तर माझं तंत्र बिघडेल असं माझ्या वडिलांना वाटायचं. त्यामुळे गल्ली क्रिकेटकडे वळायचंही नाही”, अशी वडिलांची आपल्याला सक्त ताकीद होती असंही पुजारा म्हणाला.

पुजाराचे वडिल हे त्याच्या करिअरच्या दृष्टीकोनातून इतके कडक होते की त्यांनी लहानपणी पुजाराला क्रिकेट किंवा होळी सारखे सण साजरे करायला दिले नाहीत. आपल्या मुलाच्या हाताला किंवा डोळ्याला दुखापत होईल अशी भीती त्यांना नेहमी वाटायची असं विक्रम साठ्येसोबत रंगलेल्या गप्पांमध्ये सांगितलं.
वडिलांनंतर त्यांची जागा आता आपली बायको पुजाने घेतल्याचंही पुजाराने यावेळी नमूद करतो. ” माझी प्रत्येक गोष्ट शिस्तीत पार पडली जावी याकडे ती खास लक्ष देते. सुरुवातीला आमची ओळख झाली त्यावेळी आपल्या बायकोला आंतराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट म्हणजे काय याबद्दल फारशी काही माहिती नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पुजाने आपल्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या.” कधी मी लवकर बाद झालो तर ती मला, ऑफस्पिन गोलंदाजीवर अशी विकेट कोण फेकतं का? असं विचारत मला नेहमी ताळ्यावर आणत असते.

सध्या भारतीय कसोटी संघाचा चेतेश्वर पुजारा हा एका अर्थाने आधारस्तंभ बनलेला आहे. गेल्या काही वर्षातली पुजाराची खेळी पाहता तिसऱ्या क्रमांकाची जागा त्याच्यासाठीच ठेवण्यात आल्याचं वाटतं. अनेक विक्रम मोडणाऱ्या चेतेश्वर पुजाराची फलंदाजी ही अनेक वेळा काही जणांना कंटाळवाणी वाटते. मात्र ज्या संयमाने भल्या-भल्या गोलंदाजांचा सामना करत पुजारा फटके लगावतो ते देखील पाहण्यासारखेच असतात.