जुलै-ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व सौराष्ट्रचा फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे सोपवण्यात आले आहे. चेन्नईत २२ ते २५ जुलै आणि २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या दोन सामन्यांसाठी निवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.
२७ कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या २७ वर्षीय पुजाराच्या नेतृत्वाखालील या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. कर्नाटकचा फलंदाज लोकेश राहुल (भारताकडून दोन कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व), मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (आयपीएल हंगामात प्रभावी कामगिरी), शार्दूल ठाकूर आणि तामिळनाडूचा ऑफ-स्पिनर बाबा अपराजित यांना भारत ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे. फलंदाज अभिनव मुकुंद, ऑफ-स्पिनर करुण नायर आणि यष्टीरक्षक-फलंदाज नमन ओझा या खेळाडूंमुळे हा संघ मजबूत झाला आहे. अनुभवी उमेश यादव, वरुण आरोन, अमित मिश्रा आणि प्रग्यान ओझा यांच्यासहित श्रेयस गोपाळ आणि अपराजित यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल.
भारत ‘अ’ संघ
चेतेश्वर पुजारा (कर्णधार), लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, नमन ओझा, विजय शंकर, अमित मिश्रा, प्रग्यान ओझा, शार्दूल ठाकूर, वरुण आरोन, अभिमन्यू मिथुन, उमेश यादव, श्रेयस गोपाळ, बाबा अपराजित.