कूर्मगतीने फलंदाजी केल्याबद्दल मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारावर टीका झाली होती. जलदगतीने धावा करण्याच्या सूचना संघव्यवस्थापनाने पुजाराला दिला असल्याचेही स्पष्ट झाले. संघातील स्थान टिकवण्याच्या दृष्टीने पुजाराची निर्णायक लढाई सुरू आहे. मात्र पुजारा संघाच्या योजनांचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी त्याच्यावर विश्वास प्रकट केला आहे.

‘‘वेस्ट इंडिज दौऱ्यापासून पुजाराचा स्ट्राइक रेट सुधारला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात पुजाराने ३१च्या सरासरीने दोन डावांत मिळून ६२ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत पुजाराने पहिल्या डावात ६२ तर दुसऱ्या डावात ७८ धावा केल्या. या खेळींदरम्यान त्याने मुरली विजयसह शतकी भागीदारीही साकारलीत,’’ असे कुंबळे यांनी स्पष्ट केले.

‘‘मी काहीसा पारंपरिक विचारांचा आहे. ट्वेन्टी-२०च्या आगमनानंतर फलंदाजांचा धावा करण्याचा वेग कळीचा विषय झाला आहे. मी कसोटी क्रिकेट खेळत असताना गोलंदाजांच्या स्ट्राइक रेटविषयी चर्चा होत असे. संघात विविध स्वभाव कौशल्यांची माणसे असणे आवश्यक असते. कसोटीत प्रत्येक सत्र वेगळे असते. तीच कसोटी प्रकाराची खासियत आहे. त्यामुळे स्ट्राइक रेट गोलंदाजांसाठी महत्त्वाचा आहे, फलंदाजांसाठी महत्त्वाचा नाही,’’ असे कुंबळे यांनी सांगितले.

पुजाराला वेगाने धावा काढण्यासंदर्भात सूचना देण्याबाबत विचारले असता कुंबळे म्हणाले, ‘‘अशा बातम्यांनी मी निराश झालो. आम्ही पुजारावर कोणताही दबाब आणलेला नाही. परिस्थितीशी जुळवून खेळणे महत्त्वाचे असते. पुजारा संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तो सातत्याने धावा करीत आहे. तो यापुढेही चांगला खेळत राहील.’’

‘‘कसोटीचे पहिले सत्र अत्यंत निर्णायक असते. पुजाराची शैली या सत्रासाठी चपखल आहे. पुजारावर वेगाने धावा करण्याचे दडपण नाही. कानपूर कसोटीतही त्याचे योगदान किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांसमोर आहे. प्रत्येक खेळाडूला संघातली स्वत:ची भूमिका माहिती आहे,’’ असे कुंबळे यांनी विशद केले.

दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या गौतम गंभीरबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘लोकेश राहुलला दुखापत होणे दुर्दैवी आहे. गौतमचे संघात स्वागतच आहे. सलामीवीरांना होणाऱ्या दुखापती संघासाठी वाईट आहेत. मुरली विजय वेस्ट इंडिज दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला. आता राहुल दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. गौतमने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. तो १५ सदस्यीय संघाचा भाग आहे. अंतिम संघात कोणाचीही निवड होऊ शकते.’’