गेल्या वर्षी आशिया चषकात भारताचा क्रिकेटचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होता. पण त्यावेळी असलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त होता. व्यायामशाळेत वजन उचलताना तो पडला. नशिबाने वजन त्याच्या अंगावर पडले नाही. त्यानंतर त्याला चालताही येत नव्हते. दुखापत गंभीर होती. त्यामुळे तो या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचा पर्याय म्हणून बदली यष्टीरक्षक खेळवण्याचा विचार निवड समिती सदस्यांच्या मनात होता. त्यांनी आपला विचार धोनीला सांगितला. पण धोनीने ठामपणे सांगितले, ‘माझा एक पाय दुखावला असेल, पण काहीही झाले तरी मी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणारच.’ या सामन्यात तो खेळला आणि फक्त खेळला नाही तर आपल्या नेतृत्वाखाली भारताला पाकिस्तावर विजयही मिळवून दिला. त्याच्या या जिद्दीचे कौतुक निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी एका कार्यक्रमात केले.

रविवारी रात्री तामिळनाडूच्या क्रीडा पत्रकार संघटनेने वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रसाद यांना आमंत्रित केले होते. यावेळी प्रसाद यांनी या आठवणीला उजाळा दिला. ढाका येथे फेब्रुवारी २०१६मध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना खेळवण्यात आला होता.

‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे तू खेळू शकत नसशील तर आम्ही पर्यायी व्यवस्था करू शकतो, असे आम्ही धोनीला सुचवले होते. त्यावर धोनी म्हणाला की, माझा एक पाय दुखावला असला तरी मी या सामन्यात नक्कीच खेळणार आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. धोनीचे हे वाक्य ऐकल्यावर आम्ही सारी जबाबदारी त्याच्यावर सोपवली आणि त्यानेही आमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. पूर्णपणे व्यावसायिकपणे त्याने या सामन्यात खेळ केला आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला,’ असे प्रसाद म्हणाले.

या दुखापतीबद्दल प्रसाद यांनी सांगितले की, ‘धोनी सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी व्यायामशाळेत सराव करत होता. त्यावेळी वजनाचा भार त्याला पेलवला नाही आणि तो अचानक वजनासहित जमिनीवर कोसळला. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून ते वजन त्याच्या अंगावर पडले नाही. पण या प्रकारानंतर त्याला चालताही येत नव्हते. तो रांगत होता. त्यावेळी त्याच्यासाठी ‘स्ट्रेचर’ बोलवावे लागले होते. त्यानंतर मी त्याच्या हॉटेलमधील खोलीमध्ये गेलो. त्याला दुखापतीबद्दल विचारणा केली. त्यावर धोनीने मी तंदुरुस्त असल्याचे सांगितले.’

धोनीच्या जागी पार्थिव पटेलला स्थान देण्याचा विचार निवड समिती करत होती. हे बहुदा धोनीला समजले आणि त्याने प्रसाद यांना भेटीसाठी बोलावले. या भेटीमध्ये धोनी प्रसाद यांना म्हणाला की, ‘तुम्ही माझी एवढी काळजी का करता? मी तंदुरुस्त आहे. माझा एक पाय दुखावला असेलही, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंगरूममध्ये बसणार नाही. मी पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत खेळणार.’