व्हिसा मिळविण्यासाठी रस्त्यावरच रात्र काढणाऱ्या विशेष मुलांची (मूकबधिर) अवहेलनांची मालिका अद्याप संपलेली दिसत नाही. चीन तैपेईमध्ये आशियाई पॅसिफिक मूकबधिर क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी हॉटेल्सची बिले भरली नाहीत म्हणून त्यांचे पारपत्रेच (पासपोर्ट) जप्त करण्यात आली आहेत.

ताओयुआन येथे ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताचे ४१ खेळाडू व १२ पदाधिकारी भाग घेणार होते. मात्र प्रत्यक्षात २७ जण त्यामध्ये भाग घेऊ शकले. भारतीय पथक तेथे पोहोचल्यानंतर हॉटेलचालकांनी २७ जणांचे पारपत्र जप्त केले व त्यांना संपूर्ण ५३ लोकांच्या हॉटेल आरक्षणाची रक्कम भरण्यास सांगितले. केवळ २७ स्पर्धकच येणार असल्याचे आपण कळविले होते, असा दावा भारतीय पथकातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

याबाबत अखिल भारतीय मूकबधिर क्रीडा परिषदेचे तांत्रिक सल्लागार सोमेश शर्मा यांनी सांगितले की, ‘‘आम्ही ४१ खेळाडू व १२ पदाधिकाऱ्यांसाठी परवानगी मागितली होती. मात्र २९ सप्टेंबर रोजी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने २४ खेळाडू व तीन पदाधिकाऱ्यांना पाठविण्याची परवानगी दिली. १० सप्टेंबरपूर्वीच हॉटेल आरक्षण करावयाचे होते. आम्ही त्यामध्ये मुदतवाढ मागितली होती. तसेच आमच्या पथकात २७ जणांचाच समावेश असेल, असेही आम्ही त्यांना २३ सप्टेंबर रोजी कळविले होते. आता आम्हाला ५३ जणांसाठी केलेल्या खोल्यांचे भाडे देण्याबाबत हॉटेलचालकांनी कळविले आहे. त्यासाठी आम्हाला ७ हजार २०० डॉलर्सची अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. हॉटेलचालकांनी आम्हा सर्वाचे पारपत्र जप्त केले आहे. तसेच एकाचे विदेश विनियमचे कार्डही काढून घेतले आहे.’’

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेती श्रीनिवास यांना आम्ही या घटनेबाबत सविस्तर कळविले आहे. त्यांनी प्राधिकरणाच्या संबंधित विभागाला सूचना दिल्या असून हॉटेलच्या खात्यावर सर्व रक्कम भरण्यास कळविले आहे.