हवामानाच्या व्यत्ययामुळे सुमारे चार तासांहून अधिक काळ लागलेल्या कोपा अमेरिका शतकमहोत्सवी फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य सामन्यात चिलीने कोलंबियाचा २-० असा पराभव केला. त्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत गतवर्षीचीच पुनरावृत्ती होऊन अर्जेटिना-चिली लढत होणार आहे. यंदाच्या स्पध्रेत चिली दुसऱ्यांदा अर्जेटिनाशी भिडणार आहे. ‘ड’ गटातील सलामीच्या सामन्यात अर्जेटिनाने चिलीचा २-१ असा पराभव केला होता.

शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत चिलीने मेक्सिकोचा ७-० असा धुव्वा उडवला होता. मग उपांत्य फेरीत चिलीने ११ मिनिटांत दोन गोल नोंदवून सामन्यावरील पकड घट्ट केली. बायर लीव्हरकुसेनचा मध्यरक्षक चार्ल्स एरनग्युएझने सातव्या मिनिटालाच चिलीचे खाते उघडले, तर जोस प्रेडो फ्युएनझ्ॉलिडाने ११व्या मिनिटाला संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

चिलीच्या आक्रमक सुरुवातीनंतर मध्यंतराला खेळ थांबला, तेव्हा शिकागोत थडकलेल्या जोरदार वादळामुळे खेळ थांबला. हजारो चाहत्यांना स्टेडियमच्या आतल्या भागात आश्रय घेण्याचे निर्देश देण्यात आले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागल्यामुळे मैदान रिकामे करण्यात आले. जर उर्वरित खेळ होऊ शकला नसता, तर दुसऱ्या सत्राच्या खेळासाठी संघाला गुरुवारी पुन्हा उतरावे लागले असते. मात्र दोन तास २५ मिनिटांच्या विसाव्यानंतर वादळ थांबले आणि मैदानाशी निगडित कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा साफ केला.

कोलंबियाच्या आक्रमणाने सामन्यात परतण्यासाठी त्वेषाने प्रयत्न केले, तर चिलीने तिसऱ्या गोलच्या दृष्टीने हालचाली केल्या. दुसऱ्या सत्रात पेनल्टी भागात गोन्झ्ॉलो जाराच्या पायात अडकून डॅनियल टोरेस कोसळला. तेव्हा कोलंबियाने पेनल्टीचे केलेले अपील पंचांनी फेटाळले.

रिअल माद्रिदचा दिग्गज फुटबॉलपटू जेम्स रॉड्रिगेझने सामन्यावरील कोलंबियाची पकड घट्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. कोलंबियाचे आक्रमण तेज होते, परंतु चिलीच्या बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. ५७व्या मिनिटाला कोलंबियाला आणखी एक धक्का बसला. अ‍ॅस्टॉन व्हिलाचा मध्यरक्षक कार्लोस सांचेझला दुसरे पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले. या सामन्यात पंच चिकास एग्युलर यांनी आठ पिवळे आणि एक लाल कार्ड दाखवले.