अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेची विजेती सेरेना विल्यम्स हिला चीन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळविताना झगडावे लागले. त्या तुलनेत नोवाक जोकोविच व रॅफेल नदाल यांनी पुरुष गटात सहज आगेकूच राखली.
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या सेरेनाने इटलीच्या फ्रान्सेस्का शियाव्होन हिच्यावर ६-४, ७-५ अशी मात केली. सेरेना हिला शियाव्होनविरुद्धच्या सामन्यात अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ करता आला नाही. शियाव्होन हिने केलेल्या चुकांचाच फायदा तिला अधिक मिळाला. दुसऱ्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये तिने सव्‍‌र्हिस गमावली. त्यानंतर सामना हातातून जाणार असे वाटू लागल्यानंतर तिने आक्रमक पवित्रा घेतला. तिची बहीण व्हीनसला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. विम्बल्डन उपविजेती खेळाडू सॅबिनी लॅसिकी हिने व्हीनसवर ६-१, ६-२ असा एकतर्फी विजय मिळविला.
पुरुष एकेरी गटात गतविजेत्या जोकोविच याने लुकास रोझोल याच्यावर ६-०, ६-३ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला. अमेरिकन विजेत्या नदाल याने सान्तियागो गिराल्डो याचे आव्हान ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले.
महिलांमध्ये बाराव्या मानांकित कार्ला सोरेझ हिने अपराजित्व राखताना अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिस हिचा ६-४, ६-२ असा पराभव केला.
पुरुष गटात पाचव्या मानांकित रिचर्ड गास्केटने जर्मनीच्या फ्लोरियन मेयेर याला ६-३, ७-६ (७-२) असे पराभूत केले. स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लास वॉवरिंक याने इटलीच्या आंद्रेस सेपी याचे आव्हान ४-६, ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले.