बंगळुरूतील १४ वर्षांखालील क्लब आणि शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत राहुल द्रविडचा मुलगा समित याने शतक झळकावून संघाच्या विजयाला हातभार लावला. येथील लोयोला शाळेच्या मैदानावर खेळवण्यात असलेल्या या सामन्यात दहा वर्षांच्या समितने बंगलोर युनायटेड क्लबसाठी १२५ धावांची खेळी साकारली. समित आणि प्रत्युष जी या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी रचली. समित आणि प्रत्युषच्या या भागीदारीमुळे बंगलोर युनायटेड क्लबने फ्रँक अँन्थनी पब्लिक शाळेच्या संघावर २४६ धावांनी विजय संपादन केला. फ्रँक अँन्थनी पब्लिक शाळेच्या संघासमोर विजयसाठी ३२६ धावांचे लक्ष्य होते. मात्र, त्यांचा संघ अवघ्या ८० धावांत भुईसपाट झाला. या स्पर्धेत एकुण १६ संघांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, या विजयामुळे आता अर्जुन तेंडुलकरनंतर समित चर्चेत येण्याची शक्यता आहे. समितचे वडील राहुल द्रविड सध्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मार्गदर्शक आहे. यापूर्वी राहुल द्रविडने बांगलादेशमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्यावेळी भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिकपद भुषविले होते.