ख्रिस्तियानो  रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेयमार, वेन रूनी, हॅरी केन.. आदी फुटबॉलपटू आज त्यांच्या राष्ट्रीय संघांपेक्षा कोणत्या संघासाठी खेळतात हे कुणीही फुटबॉलप्रेमी अगदी सहज सांगेल. त्यामुळे या दिग्गज खेळाडूंचे चाहते क्लब फुटबॉल पाहणेच पसंत करतात. त्याचा फायदा मोठा चाहतावर्ग निर्माण होण्यापासून ते आर्थिक उन्नतीपर्यंत जातो. हे क्लबच्या आणि खेळाडूच्या फायद्याचे असते. देशापेक्षा क्लबसाठी खेळण्याची प्रथा त्यातूनच उदयास आली. त्याचा फटका भारतात होणाऱ्या कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सहभागी संघांनाही बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोनाल्डो, मेस्सी, नेयमार या वरिष्ठ खेळाडूंनी अनेकदा राष्ट्रीय संघापेक्षा क्लबसोबत खेळण्यास प्राधान्य दिले आहे. मुळात क्लबसोबत करार झाल्यावर या खेळाडूंनी कधी राष्ट्रसेवा करावी हे निर्णय त्यांच्या हातात राहत नाहीत. त्यामुळेच कदाचित इच्छा असूनही मेस्सीला २०१८च्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेत अर्जेटिनाकडून खेळता आले नाही. या प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितीत अर्जेटिनाला सातत्याने पराभव पत्करावे लागले आणि रशियाच्या विश्वचषक स्पर्धेतील थेट प्रवेशाचा त्यांचा मार्ग बंदच झाला आहे. रोनाल्डो आणि नेयमार प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुक्रमे पोर्तुगाल आणि ब्राझील संघांवर हे संकट ओढावले नाही; पण याचा अर्थ त्यांची कामगिरी फार उजवी झाली असेही नाही. अशी अनेक खेळाडूंची उदाहरणे देता येतील, पण ही नावे सातत्याने चर्चेत असतात.

कुमार विश्वचषक स्पर्धेतही असाच राष्ट्रीय कर्तव्याचा गळा आवळण्याचा प्रकार होत आहे. ब्राझीलचा उगवता तारा अशी ओळख करून देण्यात आलेल्या व्हिनिशियस ज्युनियर यालाही फ्लॅमेंगो क्लबसोबतच्या करारामुळे विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. हे उदाहरण ताजे असताना इंग्लंडचा प्रमुख खेळाडू जॅडोन सांचो याच्या विश्वचषक सहभागावर बोरुसिया डोर्टमंडकडून प्रतिबंध लावण्यात आला आहे. खेळाडूच्या तंदुरुस्तीचे कारण पुढे करून क्लबने सांचोला केवळ साखळी सामनेच खेळण्याची मुभा दिली. या दोन्ही युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघाकडून खेळावे यासाठी अखेपर्यंत संघ व्यवस्थापन क्लब मालकांच्या निर्णयाकडे आस लावून बसले होते; पण त्यात इंग्लंडला काही प्रमाणात यश आले. हे विदेशातील फुटबॉल संस्कृतीला नवीन नसले तरी भारतीय फुटबॉल चाहत्यांना या उद्याच्या ताऱ्यांच्या दर्जेदार खेळापासून वंचित राहावे लागणार हे निश्चित. यात आणखी भर पडू नये एवढीच भाबडी आशा भारतातील युवा चाहते करत आहेत.

प्रमुख संघांशी करारबद्ध असलेले खेळाडू

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंना चेल्सी आणि रिअल माद्रिद यांनी आपल्याकडे आकर्षति केलेले पाहायला मिळते. प्रीमियर लीग विजेता चेल्सी आणि युरोपियन विजेता रिअल माद्रिद यांच्या ताफ्यात प्रत्येकी ५ खेळाडू आहेत. कॅलम हडसम, कोनोर गॅलेघर, जॉर्ज मॅक्एक्रन, जॉनथन पँझो आणि मार्क ग्युइजी हे इंग्लंडचे खेळाडू चेल्सीसोबत करारबद्ध आहेत. माद्रिदच्या चमूत अँटोनियो ब्लँको, सीजर गेलाबर्ट, मोहमेद मौखलीस, प्रेडो रुइज व व्हिक्टर चस्ट या स्पेनच्या खेळाडूंचा समावेश आहे.

इंग्लंड फुटबॉल संघटनेशी आमची चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी पुढील आठवडय़ात आम्ही सांचोला पाठवू शकतो. मात्र त्याच्या तंदुरुस्तीचा विचार करता त्याला केवळ साखळी फेरीपर्यंत खेळण्याची परवानगी आम्ही देऊ.  – मिचेल झोर्क, बोरुसिया डोर्टमंडचे क्रीडा संचालक

आम्ही व्हिनिशियसचे हित नेहमीच जपत आलो आहोत. राष्ट्रीय संघाचा तो प्रमुख आणि चतुरस्र खेळाडू आहे; पण तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही. ब्राझील संघाला मदत करण्याची त्याची इच्छा आहे, परंतु त्याला परिस्थितीचा आदर करायला हवा. संघात बरेच चांगले खेळाडू आहेत याची त्याला कल्पना आहे.    – रेनाल्डो रुइडा, फ्लॅमेंगो क्लबचे प्रशिक्षक

  • बार्सिलोना : अ‍ॅबेल रुईज, जुआन मिरांडा, मॅटेयू जायूमे, सेर्गिओ गोमेज (सर्व स्पेन)
  • मँचेस्टर सिटी : कर्टीस अँडरसन, जोएल लॅटीबेयूडीएर, फिलीप फोडन (सर्व इंग्लंड) व एरिक गार्सिया (स्पेन)
  • पॅरिस सेंट जर्मेन : क्लाऊडी गोमेज, यासिन अदिल (फ्रान्स) व टिमोथी वी (अमेरिका)
  • बायर्न म्युनिच : अ‍ॅलेक्झांडर नित्झल व लार्स मेइ (जर्मनी)
  • टोटनहॅम हॉटस्पूर : टिमोथी इयोमा व टॅशन ओक्ली-बूथ (इंग्लंड)
  • आर्सेनल : एमिले स्मिथ रोव (इंग्लंड)
  • बोरुसिया डोर्टमंड : जॅडोन सांचो (इंग्लड)
  • लिव्हरपूल : ऱ्हीआन ब्रेवस्टर (इंग्लंड)
  • मँचेस्टर युनायटेड : एंजल गोमेज (इंग्लंड)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Club culture in football
First published on: 05-10-2017 at 02:44 IST