‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे, हे नेहमीच आव्हानात्मक असते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला मला नेहमीच आवडते. त्यामुळे भारतीय संघात परतलोय, याचा निश्चितच खूप आनंद होतो आहे. आता चांगली कामगिरी बजावणे, हे माझे मुख्य ध्येय आहे,’’ अशी प्रतिक्रिया शेष भारताचा कर्णधार हरभजन सिंगने सामन्यानंतर व्यक्त केली.
तो पुढे म्हणाला, ‘‘मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच माझ्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. आता इशांत शर्माच्या साथीने भुवनेश्वर कुमार आणि अशोक दिंडा या वेगवान गोलंदाजांना, तर आर. अश्विन आणि प्रग्यान ओझासहित आम्हा तीन फिरकी गोलंदाजांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयाचे नायक होण्याची ही गोलंदाजांना चांगली संधी असेल.’’
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ फेब्रुवारीला चेन्नईत सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे विश्लेषण करताना हरभजन म्हणाला की, ‘‘कप्तान मायकेल क्लार्क आणि शेन वॉटसन वगळल्यास अन्य खेळाडू फारसे अनुभवी दिसत नाहीत. यात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त आहे, परंतु भारत दौऱ्याचा अनुभव फार थोडय़ा फलंदाजांच्या गाठीशी आहे.’’
‘‘इराणी करंडकाचा सामना खूप महत्त्वाचा होता. माझी गोलंदाजी चांगली झाली. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर चांगली गोलंदाजी करून मुंबईला नियंत्रणात ठेवण्याचे कार्य आमच्या गोलंदाजांनी चोख बजावले. शतकवीर सचिन तेंडुलकरला आणखी एका फलंदाजाची चांगली साथ लाभली असती तर फरक पडला असता. त्यानंतर दुसऱ्या डावात शेष भारताला लवकर गुंडाळून सामन्यात परतण्याची मुंबईला संधी होती, परंतु अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि मनोज तिवारी यांच्या फलंदाजीमुळे मुंबईच्या हातून सामना पूर्णत: निसटला,’’ असे हरभजनने सांगितले.
‘‘सचिन आणि वसिम जाफर फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात. त्यांच्यासारख्या फलंदाजांना मी चांगली गोलंदाजी करू शकल्याने मी स्वत:च्या गोलंदाजीविषयी समाधानी आहे,’’ असे तो पुढे म्हणाला. या वेळी हरभजनने शिखर धवनच्या फलंदाजीचे कौतुक केले.
‘‘सचिनला धावा काढताना पाहायला मला नेहमीच आवडते. सचिनविषयी बोलायला आपण फार लहान आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्धही तो अशाच धावा काढेल, अशी आशा आहे.’’
इराणी करंडक गमावणाऱ्या मुंबई संघाचा कप्तान अभिषेक नायर म्हणाला की, ‘‘झहीर खान आणि अजित आगरकर यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत आमचा गोलंदाजीचा मारा अननुभवी होता. त्या तुलनेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा अनुभवी मारा शेष भारताकडे होता. त्यामुळे आम्ही इराणी सामन्यात प्रभाव पाडू शकलो नाही.’’