नवी दिल्लीमध्ये झालेल्या मागील राष्ट्रकुल स्पध्रेत भारताने ‘अद्वितीय’ कामगिरी साकारली. मग गुआंगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताने तब्बल ६५ पदकांची लयलूट केली. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सहा पदकांची कमाई करीत भारताने आपला तिरंगा क्रीडा क्षेत्रात फडकत ठेवला. नंतर मात्र निलंबनाची कारवाई झाल्यामुळे ऑलिम्पिक चळवळीत परतण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला प्रखर लढा द्यावा लागला. यंदा २०१०च्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करणे भारताला कठीण जाईल. कारण ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये तिरंदाजी आणि टेनिसचा समावेश नाही. याचप्रमाणे भारताला सर्वाधिक पदकांची हमी देणाऱ्या नेमबाजी आणि कुस्तीमधील काही प्रकारांना कात्री लावण्यात आली आहे. परंतु बुधवारपासून सुरू होणाऱ्या २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या पदकतालिकेत अव्वल पाचांमध्ये मजल मारणे भारताला मुळीच कठीण जाणार नाही.
भ्रष्टाचार आणि क्रीडानगरीच्या बांधकामास दिरंगाई आदी वादांच्या पाश्र्वभूमीवर नवी दिल्लीत झालेली मागील राष्ट्रकुल स्पर्धा पदकांच्या दृष्टीने मात्र भारतासाठी संस्मरणीय ठरली. भारताने एकंदर (३८ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य) १०१ पदकांची कमाई करीत ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसरा क्रमांक पटकावला होता. ग्लासगोच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस असेल, परंतु १४ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या २१५ खेळाडूंच्या भारतीय चमूला तिसऱ्या क्रमांकावर मजल मारणे जड जाणार नाही.
२०१०च्या राष्ट्रकुलमध्ये भारताला १०१ पैकी ३० पदके जिंकून देणारे नेमबाज यंदा चांगल्या फॉर्मात नाहीत. परंतु अभिनव बिंद्रा, गगन नारंग, विजय कुमार आणि हीना सिद्धू या नेमबाजांकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत.

निर्विवाद वर्चस्वाची संधी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत सर्वात जास्त पदके मिळवून दिली आहेत ती कुस्तीगिरांनीच. या स्पर्धेच्या प्रारंभापासूनच भारताच्या मल्लांनी ग्रीको-रोमन व फ्री स्टाइल या दोन्ही विभागांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यंदा फक्त फ्री स्टाइल विभागाच्याच स्पर्धा असल्या तरी अन्य देशांमधील कुस्तीगिरांची आजपर्यंतची कामगिरी लक्षात घेता यंदाही भारताने निर्विवाद वर्चस्व गाजविले तर ते फारसे आश्चर्यकारक नसेल.
ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्य अशी दोन पदके मिळविणारा सुशील कुमार तसेच कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांच्याकडून सुवर्णपदकाचीच अपेक्षा आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांनंतर या दोन्ही मल्लांनी जवळजवळ दोन वर्षे स्पर्धात्मक कुस्तीपासून विश्रांती घेतली होती. त्यामुळेच या विश्रांतीचा त्यांना किती फायदा होतो हीच उत्सुकता आहे. त्यांच्याबरोबरच सत्यवान कार्डियन, बजरंग पुनिया, अमित कुमार यांच्याकडून भारताला चांगल्या यशाची अपेक्षा आहे.
महिलांमध्ये गतवेळी भारताने तीन सुवर्णपदकांसह सहा पदकांची कमाई केली होती. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती त्यांच्याकडून अपेक्षित आहे. बबिता कुमारी, गीतिका जाखर व ललिता कुमारी यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

उद्घाटन सोहळ्यात सचिनचा विशेष सहभाग
ग्लासगो : राष्ट्रकुल स्पर्धेच्या बुधवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विशेष सहभाग असणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेचे संयोजक आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे पुरस्कर्ते असलेल्या युनिसेफचा सचिन हा जागतिक सदिच्छादूत असल्यामुळे या कार्यक्रमात सचिनचा विशेष सहभाग असणार आहे. सचिन या कार्यक्रमात जगभरातील लहान मुलांना भेडसावणाऱ्या समस्या, याविषयी जनजागृती करणार आहे. मात्र सचिनचा सहभाग काय असेल, याविषयी संयोजकांनी गुप्तता बाळगली आहे. ‘‘सचिनकडून तुम्हाला एका विशेष कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे. त्यामुळे उद्याची वाट पहा,’’ असे युनिसेफचे ब्रिटनचे सदिच्छादूत लॉर्ड डेव्हिड पुथनाम यांनी सांगितले.

स्टीवर्ट, बॉयले यांची उद्घाटन सोहळ्यात अदाकारी
स्कॉटलंडमधील प्रसिद्ध ग्लासगो सेल्टिक फुटबॉल क्लबवर बुधवारी २०व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेचे राणी एलिझाबेथ दुसरी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन होईल. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाची जबाबदारी जॅक मॉर्टन वर्ल्डवाइड या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमात दोन हजार कलाकार सहभागी होणार आहेत. ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक रॉड स्टीवर्ट, सुसान बॉयले, अ‍ॅमी मॅकडोनल्ड आणि ज्युली फॉलिस आदींची अदाकारी या वेळी पेश करण्यात येईल. तीन तास चालणाऱ्या या कार्यक्रमाला रात्री ८ वाजता सुरुवात होईल.

समृद्ध इतिहास
आजपर्यंत भारताने पुरुष विभागात ३३ सुवर्ण, २६ रौप्य व १९ कांस्य अशी एकूण ७८ पदकांची कमाई केली आहे. नवी दिल्ली येथे २०१०मध्ये प्रथमच महिलांच्या कुस्ती स्पर्धेचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये भारताने तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी सहा पदके जिंकली होती.

भारतासाठी सोपी परीक्षा
पदकांची लयलूट करण्यासाठी भारताच्या दृष्टीने हा हुकमी क्रीडा प्रकार मानला जात आहे. या स्पर्धेत भारतीय मल्लांना मलेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आदी देशांकडूनच थोडे फार आव्हान असेल.

भारतीय संघ
पुरुष : अमित कुमार, बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त, सुशील कुमार, पवन कुमार, सत्यवान कार्डियन, राजीव कुमार, विनय कुमार.
महिला : बबिता कुमारी, साक्षी मलिक, ललिता कुमारी, गीतिका जाखर, नवज्योत कौर, ज्योती कुमारी.