घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा घेत लागोपाठ तिसरा विजय मिळविण्यासाठी पुणे सिटी क्लब प्रयत्नशील असून, त्याकरिता त्यांना इंडियन सुपरलीग फुटबॉलमध्ये दिल्ली संघाच्या कसोटीस उतरावे लागणार आहे. हा सामना येथे बुधवारी होणार आहे.

शिवछत्रपती क्रीडानगरीत उद्या सायंकाळी सात वाजता हा सामना होईल. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पुणे संघाने अव्वल दर्जाचा खेळ केला आहे. पहिल्या सामन्यात त्यांचा महत्त्वाचा खेळाडू आद्रियन मुट्टु याच्या अनुपस्थितीत पुणे संघाने सर्वच आघाडय़ांवर सर्वोत्तम खेळ केला होता. दुसऱ्या सामन्यात त्याच्या सहभागामुळे पुणे संघाने नॉर्थ ईस्ट युनायटेड संघावरही शानदार विजय मिळविला होता. या विजयामुळे पुण्याच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. साखळी गटात आघाडीवर असलेल्या पुण्यास दिल्लीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी फारशी अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे. मुट्टु याच्याबरोबरच ट्रन्का सान्ली, दिदियार झोकोरा यांच्यावरही पुण्याची मदार आहे.

पुण्याचा विजयरथ रोखण्यासाठी दिल्ली संघास सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे. दिल्ली संघास पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी चेन्नईविरुद्ध विजय मिळविला आहे. त्याचा फायदा त्यांना मिळेल अशी आशा आहे. त्यांचा महत्त्वाचा खेळाडू कालरेस, जॉन रिसे व फ्लोरेटा मालुडा यांच्यावर अष्टपैलू खेळाची मदार आहे.