प्राथमिक फेऱ्यांमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची युवा विश्वचषक स्पर्धेत, उपांत्य फेरीत श्रीलंकेशी लढत होणार आहे. ऋषभ पंत, इशान किशन, सर्फराझ खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण लढतीत यांच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. अवेश खान, झीशान अन्सारी, महिपाल लोमरुर आणि राहुल बॅथम यांच्यावर गोलंदाजीची धुरा आहे. श्रीलंकेच्या संघाने कॅनडा आणि अफगाणिस्तानला नमवले मात्र पाकिस्तानविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इंग्लंडला पराभूत करत श्रीलंकेने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. चरिथ असालन्का आणि अविष्का फर्नाडो यांच्यावर श्रीलंकेच्या फलंदाजीची धुरा आहे. वनिदू हसारंगा डीसिल्व्हा आणि दमिथा सिल्व्हा या जोडगोळीवर गोलंदाजीची जबाबदारी आहे.