ब्राझीलच्या कॉर्नथिअन्सने मातब्बर चेल्सीवर मात करत क्लब विश्वचषकावर नाव कोरले. चुरशीच्या अंतिम लढतीत कॉर्नथिअन्सने चेल्सीवर १-० अशी मात केली.
गुइरेरोने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर कॉर्नथिअन्सने हा दिमाखदार विजय साकारला. २००० मध्ये फिफा क्लब जागतिक अजिंक्यपद कॉर्नथिअन्सने पटकावले होते. त्यानंतरचे कॉर्नथिअन्सने मिळवलेले हे पहिलेच ऐतिहासिक जेतेपद आहे. चेल्सीचे व्यवस्थापक राफेल बेनिटेझ यांनी संघातील ऑस्कर, जॉन ओबी मिकेल आणि सेझर अझपिलीक्युइटा यांना वगळून फ्रँक लॅम्पार्ड, रामिरेस आणि व्हिक्टर मोसेस यांना संधी दिली. मात्र हे तिघेही चेल्सीला जेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे कॉर्नथिअन्सचे व्यवस्थापक टिटे यांनी डग्लसच्या जागी जॉर्ज हेन्रिकला संघात स्थान दिले. चेल्सीला गोलसाठी अनेकदा संधी मिळाल्या. कॉर्नथिअन्सच्या बचावाला भेदण्यात त्यांना अपयश आले. मध्यंतरानंतर गुइरेरोने गोल करत कॉर्नथिअन्सचे खाते उघडले. या गोलच्या जोरावरच कॉर्नथिअन्सने जेतेपदाला गवसणी घातली.