आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघातील खेळाडूंसाठी दोन मार्गदर्शन शिबिरांचे आयोजित केले जाणार आहे, यापैकी पहिल्या शिबिराला बुधवारी प्रारंभ होईल.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘‘ ख्यातनाम क्रीडा मानसतज्ज्ञ डॉ. एस. बाबरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाहोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ही शिबिरे होणार आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक वकार युनुस यांनी केलेल्या विनंतीनुसार ही शिबिरे कमी कालावधीची असणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना कंटाळा येणार नाही व त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. १९९२ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या पाकिस्तान संघातील इंजमाम उल हक व जावेद मियाँदाद या अनुभवी खेळाडूंचेही मार्गदर्शन या शिबिराला लाभणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष शहरीयार खान हे संघातील खेळाडूंसाठी शुभेच्छा भोजन देणार असून त्यावेळी ते खेळाडूंना मार्गदर्शनही करणार आहेत.’’
संघातील मिसबाह उल हक, महम्मद हफीझ व शाहीद आफ्रिदी यांनी सोमवारी राष्ट्रीय अकादमीत झालेल्या तंदुरुस्त चाचणीत भाग घेतला. मिसबाह याला स्नायूच्या दुखण्याचा त्रास होता. तो १०० टक्के तंदुरुस्त नसला तरी संघाचे नेतृत्व करण्यासाठी दोन दिवसांत तंदुरुस्त होईल. हफीझ व आफ्रिदी हे पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत.