फिलीप ह्य़ुजेसच्या दुर्दैवी निधनानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्व शंका दूर करीत सुधारित कार्यक्रमाची आखणी केली आहे. कसोटी मालिकेचा कार्यक्रम बदलण्यात आल्याने त्यानंतर होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतही बदल करण्यात आले आहेत. कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी सांगितले.
नव्या संरचनेनुसार तिरंगी मालिकेचा पहिला सामना १६ जानेवारीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनी येथे होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. मूळ कार्यक्रमानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने तिरंगी मालिकेची सुरुवात होणार होती. नव्या कार्यक्रमानुसार भारतीय संघ तिरंगी मालिकेपूर्वी सराव सामना खेळणार आहे. सराव सामन्याचे ठिकाण आणि दिवस लवकरच निश्चित होतील, असे सुदरलँड यांनी सांगितले.
पंतप्रधान एकादश आणि इंग्लंड यांच्यात मनुका ओव्हल येथे १४ जानेवारीला होणारा सामना मूळ कार्यक्रमानुसारच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची असल्याने सर्वच संघांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा याची काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅडलेड कसोटीपूर्वी धोनी संघात रुजू होणार
अ‍ॅडलेड : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा येथे नऊ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी येथे येईल असा अंदाज आहे. हाताच्या दुखापतीमुळे धोनीला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते.

तिरंगी मालिकेचा सुधारित कार्यक्रम
१६ जानेवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- सिडनी
१८ जानेवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- मेलबर्न
२० जानेवारी- इंग्लंड विरुद्ध भारत- ब्रिस्बेन
२३ जानेवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- होबार्ट
२६ जानेवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- सिडनी
३० जानेवारी- इंग्लंड विरुद्ध भारत- पर्थ
१ फेब्रुवारी- अंतिम लढत