क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांकडून चूक झाली तर पंचाकडूनत त्यांना ताकिद देण्यात येते. सूचनांचे उल्लंघन केल्यानंतर काही वेळा तर गोलंदाजांना सामन्यासाठी बंदी देखील घालण्यात येते. मात्र गोलंदाजाला ‘रेड कार्ड’ दाखवल्याचे पाहायला मिळाले तर ते क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारा क्षण असेल यात नवल नाही. क्रिडा चाहत्यांनी फुटबॉलच्या मैदानावर बऱ्याचदा ‘रेड कार्ड’चा वापर पाहिलेला असतो. मात्र क्रिकेटच्या मैदानात हा प्रकार पाहायला मिळत नाही. पण क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे बिली बाउडेन यांनी क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉलच्या पंचाच्या तोऱ्यात गोलंदाजाला सूचना दिली होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सामन्यात त्यांनी आपला वेगळा अंदाज दाखवून दिला होता.

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राला त्यांनी चक्क ‘रेड कार्ड’ दाखवले. न्यूझीलंडच्या डावातील अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला केवळ विजयाची औपचारिकता पूर्ण करायची होती. यावेळी मॅग्राने अखेरच्या चेंडूवर फलंदाजांना बुचकळ्यात पाडण्यासाठी अंडरआर्म गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजी करताना नेहमी दूर पल्ल्याहून धावत येणारा मॅग्रा अखेरचा चेंडू फेकण्यासाठी मोजक्या पावलांनी धावत आला. चेंडू फेकण्यापेक्षा त्याने फक्त अॅक्शन करुन फलंदाजाला बुचकळ्यात पाडले. त्याचा हा प्रकार विनोदी असल्याचे पंच बिली बाउडेन यांनी जाणले. यावर त्यांनी खास अंदाजात त्यांनी मेग्राकडे इशारा करत रेड कार्ड दाखवले. बिली बाउडेन यांचा हा अंदाज तमाम क्रिकेट चाहत्यांसह मैदानातील खेळाडूंच्या चेहऱ्यावरही हास्य फुलवून गेला.

न्यूझीलंडच्या बिली बाउडेन यांनी १९९५ ला न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यातून आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर २००० मध्ये त्यांना कसोटी सामन्यात पंच म्हणून मैदानात उतरण्याची संधी मिळाली. त्यांनी दिडशेहून अधिक एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारल्यानंतर असो किंवा गोलंदाजाने मिळवलेला बळीअथवा त्याने केलेली अपील असो बिली बाउडेन खास अंदाजात खेळाडूंसह लाखो क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजनच करायचे.