दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय
गॅले : डेल स्टेनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १५३ धावांनी विजय मिळवला. १ बाद ११० वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा डाव २१६ धावांतच आटोपला. कुमार संगकाराने सर्वाधिक ७६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांनी प्रत्येकी ४ बळी टिपले. डेल स्टेनने सामन्यात ९ बळी घेत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. स्टेनलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा श्रीलंकेतील हा केवळ तिसरा कसोटी विजय आहे. या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारत ‘अ’ संघ पराभूत
डार्विन : संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीनंतरही भारतीय ‘अ’ संघाला ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील एकदिवसीय लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना २५२ धावांची मजल मारली. अ‍ॅलेक्स डूलनने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. मिचेल मार्शने ६२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाचा डाव २२४ धावांत आटोपला. संजू सॅमसनने ८१ धावांची खेळी साकारली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. केन रिचर्डसनने ३१ धावांत ५ बळी घेतले.
कैफचा उत्तर प्रदेशला अलविदा
कानपूर : स्थानिक स्पर्धामध्ये सोळा वर्षे उत्तरप्रदेशकडून खेळणाऱ्या मोहम्मद कैफने आता उत्तर प्रदेशला रामराम ठोकला आहे. त्याच्याकडे आंध्र प्रदेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कैफने आंध्र प्रदेशकडून दोन वर्षे खेळण्याचा करार केला आहे. त्याने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९ हजार २७७ धावा केल्या आहेत. त्याने १४३ झेल घेतले आहेत.
बॅडमिंटन : कौशल धर्मामेर अजिंक्य
मुंबई : बॉम्बे जिमखाना आयोजित तिसऱ्या गौतम ठक्कर स्मृती अखिल भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईकर कौशल धर्मामेरने जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत कौशलने डॅनियल फरीदवर २१-१८, २४-२२ असा विजय मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात राहुल यादवने कनिष्क एम.वर २१-१३, २१-६ अशी मात केली. १९ वर्षांखालील मुलींमध्ये जी.रुथ्विका शिवानीने शिखा गौतमला २१-१५, २१-८ असे नमवले. १७ वर्षांखालील गटात वृषाली जी. हिने श्रेयंशी परदेशीचा २१-१८, २१-१७ असा पराभव केला.  
मनोरा बॅडमिंटन अकादमी स्पर्धा
मुंबई : मनोरा बॅडमिंटन अकादमीतर्फे कनिष्ठ  गटासाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ आणि ३ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा नॉर्थ इंडियन असोसिएशन, भाऊ दाजी लाड रोड एक्स्टेंशन, ऑफ सायन रोड येथे होणार आहे. १०, १३, १५ आणि १७ वर्षांखालील गटांत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेशिका नॉर्थ इंडियन असोएिशन, दादोजी कोंडदेव ठाणे, अंधेरी क्रीडा संकुल, माटुंगा जिमखाना येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत स्वीकारल्या जातील.
स्क्वॉश : श्रेयस मेहताची आगेकूच
मुंबई : वरळीतील एनएससीआय येथे सुरू असलेल्या वार्षिक कनिष्ठ आणि दुहेरी खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात अव्वल मानांकित श्रेयस मेहताने विजयाने आगेकूच केली. श्रेयसने शरण पंजाबीवर ११-७, ११-७ असा विजय मिळवला. १५ वर्षांखालील गटात अरमान जिंदालने वसू कान्सुक्वेराचा ११-८, ११-८ असा पराभव केला. देव वझिरानीने वेदांत अंबानीवर ११-४, ११-२ अशी मात केली. १३ वर्षांखालील गटात दीपक मंडलने रोहन पाध्येचा ११-३, ११-३ असा धुव्वा उडवला. योहान पोंचाने अमन पंजाबीला ११-६, ११-६ असे नमवले.
थायलंडचा कबड्डी संघ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी म्हणून थायलंडचा पुरुष आणि महिला कबड्डी संघ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आला आहे. २१ ते २६ जुलै या कालावधीत हा संघ कोल्हापूरमध्ये सराव सामने खेळणार आहे. २७ जुलैला थायलंडचा संघ मुंबईत प्रो कबड्डी स्पर्धेचे सामने पाहणार आहे. २८ ते ३० जुलै या कालावधीत हा संघ रायगड जिल्ह्य़ात सराव सामने खेळणार आहे. १ ते ४ ऑगस्ट या काळात नाशिक येथे सराव सामने होतील आणि त्यानंतर हा संघ मायदेशी रवाना होईल.