२८ सप्टेंबरपासून आंतराष्ट्रीय क्रिकेटचे सामने हे नवीन नियमांनुसार खेळवले जाणार आहेत. आयसीसीने आज यासंदर्भात घोषणा केली आहे. बॅटची जाडी, पंचांना दिलेले विशेष अधिकार आणि डीआरएस यासारख्या नियमांमध्ये आता प्रामुख्याने  बदल करण्यात आलेला आहे.

आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्यांपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेली वन-डे सामन्यांची मालिका ही जुन्या नियमांनुसारच खेळवली जाणार आहे.

काय आहेत आयसीसीचे नवीन नियम ?

१) एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत ( LBW ) असल्याचं अपील केलं, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही ‘तो’ संघ आपली ( DRS ) ची संधी गमावणार नाहीये. याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची संधी संपून जायची.

२) कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर DRS च्या दोन नवीन संधी मिळणार नाहीत. याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.

३) वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही DRS चा वापर करण्यात येणार आहे.

४) नवीन नियमांनुसार DRS मध्ये BALL TRACKING आणि EDGE DETECTION TECHNOLOGY या सुविधा असणं अनिवार्य होणार आहे.

५) आयसीसीच्या नवीन नियमांनुसार प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमि, खोली ६७ मिमि तर बॅटची कडा ही ४० मिमि इतकी असणं बंधनकारक असणार आहे.

६) फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूने मैदानात पंचांशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे.

७) धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज डाईव्ह करून क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो. चेंडू यष्टींना लागण्यापूर्वी त्याची बॅट क्रीजमध्ये असते. पण डाईव्ह केल्याने खेळाडू मागे राहतो आणि बॅटचा संपर्क क्रीजपासून तुटतो आणि फलंदाज मागे राहतो. अशा वेळी फलंदाजाला बाद घोषित केले जाते. पण नवीन नियमानुसार आता फलंदाजाला ‘संशयाचा फायदा’ देऊन नाबाद दिले जाणार आहे.

आयसीसीचे बहुतांश नियम हे सल्लामसलत करुन लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांसाठी आयसीसीने पंचांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. सर्व पंचांना या कार्यशाळेत नवीन नियमांची ओळख करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे २८ तारखेपासून होणारे सामने हे नवीन नियमांनूसार खेळवले जाणार असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलंय.