मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड आठवडय़ाभराच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. यात काही आंतरराष्ट्रीय अनुभव गाठीशी असणारे क्रिकेटपटू आहेत, तर काहींनी बीसीसीआयचा प्रशिक्षकांसंदर्भात चालवण्यात येणारा त्रिस्तरीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने निवड समिती सदस्यांप्रमाणेच प्रशिक्षकाच्या निवडीसाठीसुद्धा काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार मुंबईच्या वरिष्ठ संघासाठी प्रशिक्षक निवडताना कसोटी क्रिकेटचा अनुभव असलेल्या किंवा प्रशिक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेल्या व्यक्तीचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार आहे. तसेच ज्युनिअर गटाच्या प्रशिक्षकपदासाठी स्तरीय अभ्यासक्रमाची अर्हता किंवा रणजी क्रिकेटचा अनुभव महत्त्वाचा मानण्यात येणार आहे. याच वेळी अनेक खेळाडू घडवणारे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले किंवा स्तरीय अभ्यासक्रमही न केलेली काही प्रशिक्षक मंडळी मुंबईच्या क्रिकेटमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्तरीय अभ्यासक्रमाला आता भारतात मानाचे स्थान मिळू लागले असले तरी संघाचे चांगल्या कामगिरीत रूपांतर करणारा प्रशिक्षक महत्त्वाचा, असे सूर ‘चर्चेच्या मैदानातून’ या व्यासपीठावर उमटले.

आम्ही प्रशिक्षकाची निवड करताना बीसीसीआयच्या स्तरीय अभ्यासक्रमांचाही विचार करू. कारण हे ज्ञात असलेल्या प्रशिक्षकाला क्षेत्ररक्षण कसे करतात, दुखापती टाळून कसे खेळतात, याचे जीवतांत्रिक (बायोमॅकेनिक) पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कसोटी क्रिकेटचा अनुभव किंवा स्तरीय अभ्यासक्रम असणे महत्त्वाचे वाटते. कसोटी क्रिकेटपटू चालतो, कारण ठराविक वयोमानानंतर तुम्हाला तंत्रज्ञानावर भर द्यायचा नसतो. तुम्हाला फक्त मानसिक सामथ्र्य आणि व्यूहरचना या गोष्टींवर मेहनत घ्यायची असते. याचप्रमाणे ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे आणि नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे स्तरीय गुणवत्तेपेक्षा अनुभवी कसोटीपटू अधिक उपयुक्त ठरतो. स्तरीय अभ्यासक्रम केलेले प्रशिक्षक शास्त्रीय पद्धतीने अपेक्षित निकाल देतात, ते दीर्घ काळासाठी चांगले असतात. ज्युनिअर खेळाडूंच्या बाबतीत तंत्रावर मेहनत घ्यायची असल्यामुळे तिथे स्तरीय अभ्यासक्रम केलेला प्रशिक्षक अधिक  किफायतशीर ठरेल.
विनोद देशपांडे, एमसीएचे कोषाध्यक्ष

जसे दहावी, बारावी आणि पदवी असे शिक्षणाचे स्तर असतात. त्याच धर्तीवर बीसीसीआयने प्रशिक्षकांसाठी अ, ब आणि क स्तराचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रशिक्षकाला तंत्रशुद्ध पद्धतीने शिकवता येते. कारण जीवतांत्रिक पद्धतीने या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आलेला आहे. तसेच एखादा खेळाडूसुद्धा आपल्याकडे असलेल्या अनुभवाच्या बळावर चांगला प्रशिक्षक होऊ शकतो. त्यामुळेच भारतात आता स्तरीय अभ्यासक्रम केलेल्या प्रशिक्षकांचा प्राधान्याने विचार केला जाऊ लागला आहे. प्रशिक्षकांची अर्हता आता याद्वारे स्पष्ट होऊ शकते. सामान्यपणे प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीने हा अभ्यासक्रम केल्यास त्याच्या ज्ञानाचा विकास होतो. प्रात्यक्षिक ज्ञान हे क्रिकेट प्रशिक्षकासाठी खूप महत्त्वाचे असते. परदेशात तुमच्याकडे स्तरीय अभ्यासक्रमाची अर्हता नसेल तर तुम्ही प्रशिक्षक होऊच शकणार नाही. कितीही मोठा क्रिकेटपटू असला तरी त्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
लालचंद रजपूत,  प्रशिक्षक

प्रशिक्षक म्हणजे काय? हे समजून घेण्याची गरज आहे. शब्दकोशात प्रशिक्षकाचा अर्थ ‘खासगी मार्गदर्शक’ असा नमूद केला आहे. पण जो संघाचे रूपांतर चांगल्या कामगिरीत करतो, तो प्रशिक्षक अशी व्याख्या करायला मला आवडेल. प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही कोणती पद्धती वापरता याला महत्त्व नसते, संघाची कामगिरी चांगली होणे हे आवश्यक असते. मग एमसीसी प्रशिक्षणप्रणाली किंवा ऑस्ट्रेलियाची प्रशिक्षण पद्धती तुम्ही वापरा, परंतु निकाल काय मिळतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. संघातील खेळाडूंची कामगिरी चांगली होणे, याला मी अग्रक्रम देतो. दक्षिणेत मुले व्हायोलिन शिकतात. एका वेळी ५० जण शिकत असतात. यापैकी सर्व जण चांगले कलावंत होत नाहीत. तसेच प्रशिक्षकाचे आहे. प्रशिक्षण देणे हे एक शास्त्र आहे. परंतु ज्ञान देण्यापेक्षा कामगिरी करणारे खेळाडू घडवणे, हे खूप महत्त्वाचे असते. मात्र सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांच्या खेळात एक कला होती. त्यांनी आपल्या खेळाचे कलात्मक रूपांतरण केले असे म्हणता येईल.
विलास गोडबोले, प्रशिक्षक